कोल्हापूर : कोरोनाला प्रतिबंध करण्यासाठी राज्य शासनाने दि. ३० एप्रिलपर्यंत अंशत: लॉकडाऊन जाहीर केला आहे. पण, पर्यटन अथवा पर्यटनस्थळावर जाण्यास कोणतेही निर्बंध घातलेले नाहीत. त्यामुळे सर्व पर्यटकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. त्यांनी आपल्या नियोजित सहली पूर्ण कराव्यात. प्रवास करताना शासनाने लागू केलेल्या कोरोनाबाबतच्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन ट्रॅव्हल एजंट असोसिएशन ऑफ कोल्हापूरच्यावतीने (टाक) मंगळवारी करण्यात आले.
ज्या पर्यटकांनी आधीपासून नियोजित देशांतर्गत सहलींची नोंदणी केली आहे, त्यांनी घाबरून न जाता, कुठलीही चुकीची माहिती ऐकून प्रवासाचे नियोजन रद्द करून स्वत:चे अथवा पर्यटन कंपनीचे नुकसान करू नये. सध्या कोल्हापूर जिल्ह्यातील आणि परिसरातील अनेक प्रवाशांनी हिमाचल, काश्मीर, उत्तरांचल, उत्तराखंड आणि इतर राज्यांतील सहलींचे नियोजन पर्यटन कंपन्यांकडून केले आहे. या सर्व पर्यटन स्थळांवर एप्रिल, मे आणि जून हा पर्यटन हंगाम सुरू आहे. त्याठिकाणी रेल्वे, विमान, बस प्रवास व्यवस्था सुरू असल्याची माहिती ‘टाक’च्यावतीने एन. एन. अत्तार आणि बळीराम वराडे यांनी दिली.
यावेळी अमित चौकले, रवी पोतदार, सूरज नाईक, उमेश पवार उपस्थित होते.