कोल्हापूर : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी ‘ब्रेक द चेन’ अंतर्गत पुकारलेल्या संचारबंदीत आंतरजिल्हा प्रवासासाठी ‘ई-पास’ची आवश्यकता असून, त्यासाठी जिल्ह्याच्या सायबर सेलकडे हजारो अर्ज येत आहेत. पाससाठी रुग्णालय अथवा अंत्यसंस्कार या दोन कारणांशिवाय ई-पास मंजूरच होत नसल्याचे प्रत्येकाच्या लक्षात आले. त्यामुळे हीच दोन कारणे बहुतांशी पाससाठी अर्जदारांकडून दिली जात आहेत.
कोरोना महामारीचा कोल्हापूर जिल्ह्यात कहर झाला असताना, कोरोनाची साखळी तोडण्यासाठी प्रशासकीय पातळीवर प्रयत्न सुरु आहेत. त्यासाठी महाराष्ट्र शासनाने संचारबंदी पुकारली आहे. या संचारबंदीत आंतरजिल्हा प्रवास करायचा असेल तर ई-पास अनिवार्य आहे. सध्या कोल्हापूर जिल्ह्यातून बाहेर जाण्यासाठी ‘ई-पास’साठी अर्ज केले जात आहेत. जिल्ह्यातून मुंबई, पुणे, सांगली, सातारा, सोलापूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी आदी ठिकाणी जाण्यासाठी रोज ई-पासची मागणी होते. आतापर्यंत सुमारे २४ हजार ८०३ लोकांनी त्यासाठी अर्ज केले तर त्यापैकी योग्य कारण असलेल्या ५,०६४ जणांनाच ई-पास मंजूर केले, इतरांचे सबळ कारण अगर अपुरी कागदपत्रे असल्यामुळे ई-पास नामंजूर केले आहेत.
प्रवासासाठीची कारणे...
रक्तातील प्रथम नातेवाईकांचा नजीक काळात अचानक मृत्यू झाल्यास अंत्यसंस्काराला जाण्यासाठी, शासनाने घालून दिलेल्या नियमानुसार लग्न समारंभासाठी जाणाऱ्या मोजक्या लोकांसाठी, अत्यंत गंभीर रुग्णाचे उपचारार्थ बाहेरगावी जाण्यासाठी ई-पास मंजूर केला जातो. पण त्याशिवाय बाहेरगावी शिकणाऱ्या मुलाला आणण्यासाठी जाणे, गावी गेलेल्या पत्नीला आणण्यासाठी जाणे, आदी कारणांसाठीही नागरिक अर्ज करत आहेत.
ही कागदपत्र आवश्यकच...
हॉस्पिटलचे काम असेल तर त्यांची कागदपत्रे, मेडिकलचे काम असेल तर त्याचा पुरावा, लग्नकार्य असेल तर लग्नपत्रिका, प्रत्येकाचा कोरोना चाचणी अहवाल आवश्यक आहे. शिवाय प्रवास करणाऱ्या प्रत्येकाचे आधारकार्ड सोबत जोडावे लागते.
अवघ्या तीन ते चार तासात मिळतो पास...
‘ई-पास’साठी ऑनलाईन अर्ज केल्यानंतर त्याची सायबर सेलमध्ये तपासणी केली जाते. तसेच सोबत जोडलेली आवश्यक कागदपत्रे जर योग्य असतील तर अर्ज केल्यानंतर अवघ्या तीन ते चार तासात पासबाबत मंजूर अथवा नामंजूर अशी निर्गती होते.
‘ई-पास’साठी असा करावा अर्ज
ई-पास आवश्यक असलेल्या नागरिकांनी कोल्हापूर पोलीस दलाचे http//covid19.mhpolice.in / या वेबसाईटवर जावून ज्या ठिकाणाहून प्रवास करायचा आहे, ते पोलीस आयुक्तालय अथवा जिल्हा पोलीस विभाग निवडावा. त्यानंतर स्वत:चे नाव, कोणत्या तारखेपासून प्रवास करायचा आहे ते लिहून, मोबाईल क्रमांक, प्रवासाचे कारण, वाहन क्रमांक, सध्याचा पत्ता, ई-मेल, प्रवास प्रारंभ ठिकाण ते अंतिम ठिकाण, सोबतच्या प्रवाशांची संख्या याची माहिती द्यावी.
- आतापर्यत ई-पाससाठी आलेले अर्ज : २४,८०३
- आठवड्यात ई-पाससाठी आलेले अर्ज : ८,७२४
- आतापर्यंत मंजूर केलेले ई-पास : ५,०६४
- प्रलंबित अर्ज : ००