कोल्हापूर : आघाड्यांतर्गत कुरघोड्या, एकमेकांना शह देण्याचे राजकारण, काही मूठभर नगरसेवकांची दादागिरी, अधिकाऱ्यांना होत असलेली शिवीगाळ आणि कामे होत नसल्याने हतबल झालेल्या काही नगरसेवकांनी अधिकारी पैसे खात असल्याचे केलेले आरोप, त्याला आयुक्त पी. शिवशंकर यांनी दिलेले उघड आव्हान या साऱ्या गोंधळाच्या कारभारामुळे महानगरपालिका हद्दीतील नागरी समस्या जटील बनत चालल्या आहेत. त्याचा विकासकामांवर परिणाम होऊन कामांची गती मंदावली आहे. अनेक प्रकल्प बंद पडले आहेत. गतवर्षी आॅक्टोबर महिन्यात महानगरपालिकेची निवडणूक झाली आणि काही नवी उमेद घेऊन निवडून आलेल्या नगरसेवकांच्या उत्साहाला वर्षभरातच ओहोटी लागली आहे. पंचवीस ते तीस लाख रुपये खर्च करून हेच अनुभवायला येथे आलो काय, असा प्रश्न आता अनेक होतकरी नगरसेवकांना पडला आहे. महानगरपालिकेची जी काही बदनामी व्हायची होती, ती वर्षभरात झाली. आता नवे ठेकेदार महानगरपालिकेचे काम घेतील का, अशीही भीती व्यक्त करणारा प्रश्न उपस्थित झाला आहे. निवडणुकीत कॉँग्रेस-राष्ट्रवादी आणि ताराराणी आघाडी-भाजप असा सामना रंगला. त्यातून जिल्ह्यातील नेत्यांच्या राजकीय संघर्षाची बीजे पुन्हा एकदा रोवली गेली. त्यामुळेच महापालिका निवडणूक संपल्यानंतरही हा संघर्ष संपला नाही. सुनील कदम यांना स्वीकृत नगरसेवक म्हणून घेण्यास कॉँग्रेस-राष्ट्रवादीने आक्षेप घेत बऱ्याच उचापती केल्या. राजकारण : ‘सेफ सिटी’चे उद्घाटन का नाही? ४कोल्हापुरात राबविण्यात आलेला ‘सेफ सिटी’ हा अत्यंत महत्त्वाचा प्रकल्प आहे. त्यातील काही त्रुटी वगळता त्याचे परिणाम चांगले दिसून येत आहेत. त्यासाठी महानगरपालिका व जिल्हा नियोजन मंडळातून निधी देण्यात आला आहे. ४एरवी दोन- पाच लाखांच्या विकासकामांची उद्घाटने करून त्यांचे फोटो काढले जातात; परंतु तब्बल साडेसात कोटी रुपयांच्या प्रकल्पाचे उद्घाटन अद्यापही झालेले नाही. ४जर कार्यक्रम करायचा ठरविले तर त्याला पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांना बोलवावे लागेल, या एकाच भीतीने हा प्रकल्प उद्घाटनाशिवाय सुरू झाल्याचे नगरसेवक सांगतात. ४महानगरपालिकेच्या शाळेला प्रथमच ‘आयएसओ ९००१’ हे जागतिक दर्जाचे मानांकन मिळाले. त्याबद्दल या शाळेचा गुणगौरव करण्याचा कार्यक्रम नगरसेवकाने ठेवला होता. ४या कार्यक्रमास महापौर अश्विनी रामाणे या अनुपस्थित होत्या. ज्यांनी कार्यक्रम आयोजित केला, ते ताराराणी आघाडीचे आहेत, या एकमेव कारणाने त्या अनुपस्थित राहिल्याची चर्चा इथे होती.
महापालिकेमध्ये गोंधळ, विकासकामांचा बट्ट्याबोळ
By admin | Published: November 02, 2016 12:55 AM