पोपट पवार
कोल्हापूर : राज्यातील शिक्षणसेवकांना पहिली तीन वर्षे अगदी अल्प मानधन मिळत असल्याने स्वत:च्या खर्चासाठीही त्यांना दुसऱ्यांकडून हातउसने पैसे घ्यावे लागत होते. आता मात्र सरकारने मानधनात अपेक्षित वाढ केल्याने स्वत:सह कुटुंबालाही हातभार लावता येणार असल्याची प्रतिक्रिया कोल्हापूर जिल्ह्यातील शिक्षणसेवकांकडून व्यक्त होत आहे. सरकारच्या या निर्णयामुळे आमचा चरितार्थही चालेल आणि आमच्यावर अवलंबून असणाऱ्या कुटुंबाच्या हालअपेष्टाही थांबतील, अशी भावना अनेकांनी व्यक्त केली. राज्य सरकारने २००० साली शिक्षणसेवकांच्या नियुक्तीचा निर्णय घेतला होता. राज्यातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक विद्यालयातील नियुक्त शिक्षकांना पहिली तीन वर्षे शिक्षण सेवक म्हणून मानधन दिले जाते. तो कार्यकाळ पूर्ण केलेल्यांना नियमित सेवेत घेऊन त्यांना पूर्ण वेतन दिले जाते.२०११ मध्ये केली होती वाढनियुक्त केलेल्या शिक्षणसेवकांना पहिली तीन वर्षे अगदी तुटपुंजे मानधन होते. त्यामुळे दैनंदिन गरजा भागविणेही त्यांच्यासाठी मुश्कील होते. शिक्षणसेवकांच्या मागणीनंतर २०११ मध्ये सरकारने काहीशी वाढ केली होती. मात्र, तेही मानधन समाधानकारक नव्हते. सध्या प्राथमिक शिक्षणसेवकांना सहा हजार रुपये, माध्यमिक शिक्षणसेवकांना आठ हजार रुपये, तर उच्च माध्यमिक शिक्षणसेवकांना नऊ हजार रुपये मानधन दिले जात होते. शिक्षणसेवकांच्या मागणीनंतर आता या मानधनात वाढ केली आहे.नव्या शिक्षणसेवकांना मिळणार लाभगेल्या काही वर्षांपासून राज्यात शिक्षणसेवकांची भरती झालेली नाही. त्यामुळे सरकारच्या या निर्णयाचा लाभ मिळणाऱ्यांची संख्या नगण्य आहे. लवकरच राज्यात ६७ हजार शिक्षणसेवकांची भरती केली जाणार असल्याचे राज्य सरकारने सांगितले आहे. त्यामुळे राज्य सरकारच्या या मानधनवाढीचा लाभ नव्या शिक्षणसेवकांना अधिक होणार आहे.आता किती मानधनवाढप्राथमिक शिक्षणसेवकांना सहा हजार रुपयांवरून १६ हजार रुपये मानधनवाढ करण्यात आली आहे. माध्यमिक शिक्षणसेवकाचे मानधन आठ हजार रुपयांवरून १८ हजार रुपये करण्यात आले आहे, तर उच्च माध्यमिक शिक्षणसेवकांचे मानधन नऊ हजार रुपयांवरून थेट २० हजार रुपये करण्यात आले आहे.डिसेंबरमध्ये घेतला होता निर्णयसरकारने २२ डिसेंबर २०२२ मध्ये झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत शिक्षणसेवकांच्या मानधनवाढीचा निर्णय घेतला होता. त्याचा अध्यादेश ७ फेब्रुवारी २०२३ रोजी काढण्यात आला.जिल्ह्यात किती जणांना होणार लाभप्राथमिक- ७माध्यमिक- ५५उच्च माध्यमिक- ०(गत महिन्यांत १०० हून अधिक जण तीन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करून कायम सेवेत गेले आहेत.)
सुरुवातीला तीन वर्षे अल्प मानधन असल्याने घरखर्चही भागत नव्हता. त्या तुलनेत सरकारने आता केलेली मानधनवाढ समाधानकारक आहे. - संतोष झिंत्रे - शिक्षणसेवक, केएमसी कॉलेज, कोल्हापूर
मानधनवाढीचा निर्णय चांगला आहे. यामुळे शिक्षणसेवकांना निदान स्वत:चा खर्च तरी स्वत:च्या पैशातून करता येईल. महागाईच्या काळात ही वाढ कमी असली तरी पूर्वीच्या तुलनेत ती खूपच अधिक आहे. - अनिल माळगे, शिक्षणसेवक, भोगावती.