कोल्हापूर : एकीकडे महापालिकेच्या शाळेत विद्यार्थीच येत नसल्याची ओरड करणाऱ्या कोल्हापूर महानगरपालिका प्रशासनाला विद्यार्थ्यांनी फुल्ल झालेल्या फुलेवाडीतील रावबहादूर दाजिबा विचारे विद्यामंदिरला गेल्या चार वर्षांपासून इमारतीसाठी निधी देता आलेला नाही. त्यामुळे या शाळेचे विद्यार्थी सध्या झाडाखाली, एका दुकान गाळ्याच्या पत्र्याच्या शेडखाली बसून शिक्षण घेत आहेत. ऊन, वारा, पावसाचा सामना करत गेल्या चार वर्षांपासून विद्यार्थी ज्ञानार्जन करीत असूनही महापालिका प्रशासन व लोकप्रतिनिधींना या विद्यार्थ्यांसाठी निवारा करावासा वाटला नाही. शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या पालकत्व जिल्ह्यातच शिक्षणाबाबतची ही दयनीय अवस्था असेल तर इतरांचे काय, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाला आहे.रंकाळा बसस्थानकाजवळ महापालिकेची बंद असलेली रावबहादूर दाजिबा विचारे विद्यालय ही शाळा २०१९ मध्ये माजी शिक्षण समिती सभापती वनिता देठे यांच्या पुढाकाराने फुलेवाडी रिंग रोड, गंगाई लॉनजवळ स्थलांतरित केली. सेमी इंग्रजी माध्यमाच्या या शाळेत सध्या पहिली ते चौथीपर्यंत तब्बल २१० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या शाळेची गुणवत्ता चांगली असल्याने प्रवेशासाठी रीघ लागली आहे.मात्र, मुलांना बसायलाच जागा नसल्याने शाळेने प्रवेश बंद केले आहेत. या परिसरात महापालिकेच्या तीन ठिकाणी जागा आहेत. शाळेच्या इमारतीसाठी निधी देण्याचा प्रस्ताव तीन वर्षांपूर्वी महापालिकेला दिला आहे. पण, त्यावर कोणतीच कार्यवाही होत नसल्याने विद्यार्थ्यांना उघड्यावर शिक्षण घेण्याची वेळ आली आहे.
शाळेची गुणवत्ता चांगली असल्याने आम्ही पाल्याला दोन वर्षांपूर्वी शाळेत प्रवेश घेतला. पण, इमारत नसल्याने विद्यार्थ्यांची कुचंबणा होत आहे. - प्रीती गव्हाणे, पालक
महापालिकेच्या चिंतामणी हॉलमध्ये या विद्यार्थ्यांची सोय करण्यात येईल. सीएसआर फंडातून इमारत बांधून देण्याचा एक प्रस्ताव आमच्याकडे आला आहे. त्यावर निर्णय झाला नाही तर महापालिका स्तरावर लवकरच इमारतीसाठी कार्यवाही सुरू करू. - शंकर यादव, प्रशासनाधिकारी, शिक्षण विभाग, महापालिका