कोल्हापूर : निधन झाल्यानंतर अवघ्या तीन महिन्यात लता मंगेशकर यांच्या नावाने विद्यापीठ स्थापनेसाठी १०० कोटी रुपये सरकार मंजूर करते, पण त्याच वेळी शाहू महाराजांच्या स्मृती शताब्दीसाठी एक दमडीही देत नाही ही शोकांतिका आहे, अशी खंत शाहूप्रेमींनी सलाेखा मंचच्या बैठकीत व्यक्त झाली. सरकारची दानत नसल्याने आता स्वतःहून मदत निधी गोळा करून लोकराजा शाहू महाराज यांचा कर्तुत्वाला शोभेल असा दिमाखदार सोहळा साजरा करू असा निर्धारही केला गेला.
लोकराजा शाहू स्मृती शताब्दी निमित्त शाहू स्मारक मध्ये राजर्षी शाहू सलोखा मंचची बैठक झाली. मराठा महासंघाचे वसंतराव मुळीक यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीला बबन रानगे, सुरेंद्र जैन, इंद्रजीत सावंत, दगडू भास्कर, प्रा. जे.के. पवार, विलास पवार, शैलजा भोसले, हसन देसाई, अवधूत पाटील, शशिकांत पाटील, सचिन चौगुले यांची प्रमुख उपस्थिती होती.शाहू महाराज यांचे नाव घेऊन राजकारण करायचे पण त्यांच्यासाठी म्हणून जेव्हा पैसे खर्च करण्याची वेळ येते तेंव्हा मात्र नेते पळ काढतात अशी खंत व्यक्त करत इंद्रजित सावंत यांनी चर्चेला तोंड फोडले. वसंतराव मुळीक यांनी ही निधी नसल्याने कार्यक्रमाचे नियोजन करायचे की मदत निधी गोळा करत फिरायचे हेच कळेना झाले आहे, हा कार्यक्रम आधी ठरला असता तर आम्ही निदान पैशाची जोडणी केली असती, पण दहा दिवसात काय आणि कसे करायचे असा प्रश्न आहे. रोज सकाळी उठून मदत निधीसाठी फिरावे लागत आहे. शाहू महाराजांचे आपल्यावर ऋण आहेत असे समजा आणि आपल्या परीने मदत निधी द्या, सर्वांच्या सहकार्याने दिमाखदार सोहळा करू अशी अपेक्षा व्यक्त केली.स्मृतीशताब्दीच्या आयोजनासह स्मृतीस्तंभ तयार करण्यातही शाहू प्रेमीनीच योगदान दिले. त्याचा खर्चही जनतेनेच वर्गणी काढून भागवला.
जैन यांची लाखाची मदतमदत निधी गोळा करण्याची घोषणा झाल्यावर लगेचच मदत संकलन सुरुही झाले. सुरेंद्र जैन यांनी एक लाख जाहीर केले. रिक्षाचालकासह इतरांनी मिळून ४२ हजार रुपये दिले.
३ मे रोजी जागर यात्रा मुंबईला जाणाऱ्या जागर यात्रेचे नियोजन करण्यात आले. ३ मे रोजी सकाळी आठ वाजता दसरा चौक़ातून चित्ररथासह निघणारी ही यात्रा पाच रोजी मुंबईत पोहचेल तिथे अभिवादन करुन सहाला कोल्हापुरातील मुख्य कार्यक्रमाला येईल असे ठरले.