जयसिंगपूर / दानोळी : दानोळी (ता. शिरोळ) येथे मित्रानेच मित्राचा धारदार शस्त्राने खून केल्याची घटना शनिवारी मध्यरात्री घडली. संतोष शांतीनाथ नाईक (वय ३३, रा. अंबाबाई मंदिर शेजारी, दानोळी) असे मृताचे नाव आहे. घटनेनंतर फरार झालेल्या संशयित प्रशांत मारुती राऊत (३४, रा. शिवतेज चौक, दानोळी) याला रात्री अटक करण्यात आली. व्यवसायात नफा होत नसल्याच्या कारणातून हा खून झाल्याची तक्रार राजेंद्र श्रीधर नाईक यांनी जयसिंगपूर पोलिसांत दिली. या घटनेमुळे दानोळीसह परिसरात खळबळ उडाली आहे.प्रशांत व संतोष या दोघा मित्रांनी प्रासा काॅर्पोरेशन ही इम्पोर्ट एक्स्पोर्टची कंपनी काढली होती. या कंपनीमध्ये काही नफा होत नसल्याने, शिवाय संतोष हा व्यवसायात लक्ष घालत नसल्याच्या कारणातून शनिवारी रात्री छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण या ठिकाणी दोघे बोलत बसले होते. व्यवसायात संतोष हा लक्ष देत नव्हता. त्याचा राग मनात धरून प्रशांतने संतोषच्या मानेवर, पोटावर व पाठीवर धारदार शस्त्राने वार करून त्याचा खून केला.मध्यरात्री दोन वाजता जयसिंगपूर पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. यावेळी पोलिस उपअधीक्षक समीरसिंह साळवी, पोलिस निरीक्षक सत्यवान हाके यांनी पाहणी करून तपासाच्या सूचना केल्या. शिरोळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात विच्छेदन करून मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. घटनेनंतर फरार झालेल्या संशयितास रात्री अटक करण्यात आली.
पोलिस येताच तो पळालाखुनाच्या घटनेनंतर प्रशांत याने मित्र रूपेश याला खून केल्याचे सांगितले. या घटनेची माहितीदेखील पोलिसांना मिळाली होती. याचदरम्यान दानोळी परिसरात गस्त घालणारे पोलिस वाहन येत असल्याचे समजताच संशयित प्रशांत हा तेथून फरार झाला. रविवारी सकाळी श्वानपथकाने पाहणी केली होती; मात्र तो मिळाला नव्हता. रात्री शेतामध्ये तो मिळून आला.
संतोषवर तीन वर्मी घावज्या क्रीडांगणावर संतोषचा मृतदेह पडला होता त्या ठिकाणी पोलिसांना चाकू मिळून आला आहे. शिवाय मद्याची बाटलीदेखील सापडली आहे. तीन ठिकाणी वार केल्यामुळे पोटामधून मोठा रक्तस्राव होऊन संतोष हा जागीच ठार झाला होता.
कुणाचे नेमके कारण पुढे येणार ?दोघा मित्रांनी मिळून काढलेल्या व्यवसायात नफा होत नव्हता. शिवाय संतोष हा व्यवसायात लक्ष घालत नव्हता. यातून खून झाल्याचे प्रथमदर्शनी पुढे आले आहे. दरम्यान, पोलिस तपासांत खुनाचे नेमके कारण समजण्याची शक्यता आहे.