भीमगोंडा देसाई कोल्हापूर : संपूर्ण जिल्ह्याचे कार्यक्षेत्र असलेल्या येथील अन्न व औषध प्रशासनाकडे वारंवार तळले जाणाऱ्या तेलामधील भेसळ ओळखणारे एकही टीपीसी मशिन नाही. वारंवार शासनाकडे मागणी करूनही न मिळाल्याने पुण्याहून दोन मशिन उसनवारीवर मागवून घेतली आहेत. प्रत्येक तालुक्याला एक याप्रमाणे या मशिनची गरज असताना जिल्ह्याला एकही हक्काचे मशिन उपलब्ध नसल्याने शासनाचा गलथान कारभार चव्हाट्यावर आला आहे.दोनच उसन्या घेतलेल्या मशिनवर कामकाज करताना अन्न व औषध प्रशासनाची तारांबळ उडत आहे. यामुळे वारंवार तळले जाणारे खाद्यतेल ओळखायचे कसे? असा प्रश्न अन्न व औषध प्रशासनालाही पडला आहे. अशाप्रकारे तेल वापरणाऱ्यांवर कारवाई होत नसल्याने त्याचा सर्रास वापर होत आहे. परिणामी अशा तेलातील खाद्यपदार्थ खाणाऱ्यांना पोटविकाराच्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे.
दसरा, दिवाळी जवळ आली आहे. या सणांत मोठ्या प्रमाणात तेलकट पदार्थांना मागणी असते. यामुळे असे पदार्थ बनविण्याची लगीनघाई सुरू झाली आहे. पण दर्जेदार तेल वापरल्याने नफा कमी होतो. परिणामी विक्रेते पैसे वाचवून नफा मिळविण्यासाठी वारंवार तळलेल्या तेलाचा वापर करतात. भेसळीच्याही तक्रारी आहेत. स्वस्त, निकृष्ट, हानिकारक तेलाचाही वापर होत आहे. याची तपासणी करून कारवाई करण्यासाठी आवश्यक असणारी यंत्रे पुरेशा प्रमाणात नसल्याचे चित्र आहे.
काय आहे टीपीसी मशिन ?टीपीसी म्हणजेच टोटल पोलर काऊंट मशिन. या मशीनद्वारे जळालेले तेल तपासता येते. त्या तेलात भेसळ आहे की नाही, याचीही स्पष्टता होते. त्यानंतर या विभागाकडून संबंधित आस्थापनेवर कारवाई केली जाते. त्यांना दंड ठोठावला जातो.
१२ मशिनची आवश्यकताजिल्ह्यासाठी १२ टीपीसी मशिनची गरज आहे. या मशिनव्दारे तपासणी करण्यासाठी १२ अधिकाऱ्यांची पदे मंजूर आहेत. पण यातील सहा पदे रिक्त आहेत. केवळ सहाच अधिकारी कार्यरत आहेत. सहा अधिकारी आणि पुण्याहून उसनी मागून घेतलेली दोन टीपीसी मशिन यावर सध्या कामकाज सुरू आहे. मनुष्यबळ कमी असल्याने कामाचा ताण वाढला आहे. त्यामुळे अनेकवेळा कारवाई करताना अडचणी येत आहेत.
जिल्ह्यासाठी १२ टीपीसी मशिनची आवश्यकता आहे. पण येथील कार्यालयाकडे एकही मशिन नसल्याने पुण्याहून दोन मशिन उसनी मागून घेतली आहेत. - तुषार शिंगाडे, सहायक आयुक्त, अन्न व औषध प्रशासन, कोल्हापूर