कोल्हापूर : पन्हाळा पोलिस ठाण्याचे निरीक्षक अरविंद काळे यांच्या विरोधात महिला कॉन्स्टेबलने केलेल्या तक्रार अर्जाची विशाखा समितीने चौकशी पूर्ण केली. उपलब्ध पुरावे आणि साक्षी यांच्या आधारे तक्रारीत तथ्य नसल्याचे स्पष्ट झाले. पोलिस निरीक्षक काळे निर्दोष असून, चौकशी अहवाल पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांच्याकडे सोपवल्याची माहिती विशाखा समितीच्या अध्यक्षा तथा अपर पोलिस अधीक्षक जयश्री देसाई यांनी दिली.पोलिस निरीक्षक काळे यांनी असभ्य वर्तन करून पोलिस ठाण्यातच शरीरसुखाची मागणी केल्याची गंभीर तक्रार महिला कॉन्स्टेबलने केली होती. १५ नोव्हेंबरला तक्रार अर्ज दिल्यानंतर पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी त्याची गांभीर्याने दखल घेऊन तातडीने स्वत: काळे यांची प्राथमिक चौकशी केली. त्यानंतर संबंधित महिलेच्या तक्रार अर्जाची सखोल चौकशी करण्याचे काम विशाखा समितीकडे सोपवले. विशाखा समितीच्या अध्यक्षा तथा अपर पोलिस अधीक्षक जयश्री देसाई, पोलिस उपअधीक्षक प्रिया पाटील, यांच्यासह दहा सदस्यांच्या समितीने तक्रारदार महिला कॉन्स्टेबल आणि काळे यांची स्वतंत्र चौकशी केली. उपलब्ध पुरावे आणि साक्षींच्या आधारे चौकशीनंतर तक्रारीत तथ्य नसल्याची माहिती समोर आल्याचे अपर पोलिस अधीक्षक देसाई यांनी सांगितले.
- चौकशीचा अहवाल पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांच्याकडे सोपवला आहे. तक्रारदार महिलेने खोटा अर्ज का केला?, अधिकाऱ्यांविरोधात केलेल्या खोट्या तक्रारीबद्दल संबंधित महिलेवर काय कारवाई होणार? याबाबत अधिक माहिती देण्यास विशाखा समितीच्या अध्यक्षांनी नकार दिला.
- तक्रारदार महिलेवरील कारवाईचा अधिकार पोलिस अधीक्षकांचा असून, योग्य वेळी ते उचित कारवाई करतील, असे अपर पोलिस अधीक्षक देसाई यांनी सांगितले.
पोलिस निरीक्षकांबद्दल आलेल्या तक्रारीची अतिशय गांभीर्याने दखल घेऊन विशाखा समितीमार्फत सखोल चौकशी करण्यात आली. तक्रारदार महिला कॉन्स्टेबलच्या अर्जात तथ्य नसल्याचे दिसून आले. - जयश्री देसाई, अपर पोलिस अधीक्षक, कोल्हापूर