विश्वास पाटीलकोल्हापूर : तुम्हाला हवे तेवढे कर्ज आणि ते देखील कोणतेही तारण न घेता देतो, तुम्ही फक्त कर्जाच्या काही टक्के अनामत रक्कम रोख आमच्या बँकेत भरा, असे आमिष दाखवून नव्यानेच स्थापन झालेल्या एका निधी बँकेने अनेकांना गंडा घातल्याचे प्रकरण पुढे आले आहे. पैसे भरलेल्या एकाही व्यक्तीला कर्ज मिळालेले नाही आणि अनामत म्हणून घेतलेली रक्कमही परत मिळत नसल्याने कर्ज मागणारे हेलपाटे मारून बेजार झाले आहेत. प्राथमिक माहितीनुसार फसवणुकीचा आकडा काही लाखांत आहे.तारण द्यायला काहीच नसते; परंतु विविध कारणांसाठी कर्जाची गरज असणाऱ्यांची संख्या मोठी आहे. नावावर घर नसते, शेतीचा सातबारा एकत्रित असतो. नोकरी खासगी असते, सोनेनाणे नसते मग तारण काय द्यायचे, असा प्रश्न असतो. त्यांना कर्ज हवे असते, त्याचे नियमित हप्ते परत करण्याचीही त्यांची तयारी असते. ही अगतिकता ओळखूनच या बँकेने विनातारण कर्जाचा जाहिरात केली. करवीर तालुक्यातील पश्चिमेकडील एका तरुणाचे लग्न ठरत नव्हते. त्यासाठी घराची डागडुजी त्याला करायची होती. त्यासाठी कर्ज हवे होते म्हणून त्याला कुणीतरी या बँकेचा पत्ता दिला. त्यानुसार तो मित्राला घेऊन बँकेत गेला. बँकेने तीनच नव्हे, तर पाच लाख देतो, असे आश्वासन त्यांना दिले. त्यानुसार त्यांनी १३,५०० रुपये ३ एप्रिल २०२४ ला बँकेत रोख भरले. सर्व प्रक्रिया पूर्ण व्हायला महिनाभर लागेल असे सांगितले; परंतु आता तीन महिने उलटून गेले तरी अजून कर्जाचा पत्ता नाही. कर्ज कधी मिळणार म्हणून मित्रासह तो हेलपाटे मारून दमला आहे. आता या बँकेचे कार्यालय रंकाळ्याजवळ आले आहे. तिथे अनेक लोक कर्ज तरी द्या किंवा आमची अनामत तरी परत द्या म्हणून गर्दी करीत आहेत. काहींनी ३५ हजार, काहींनी त्याहून जास्त रक्कम भरली आहे. जेवढी कर्ज जास्त तेवढी अनामत जास्त असा त्यांचा नियम आहे. आता तुमचे खाते अपडेट करण्यासाठी २ हजार रुपयांची एनईएफटी करा, असे त्याला सांगितले आहे; परंतु अनामत व नंतर एनईएफटी करूनही सहा-सहा महिने झाले तरी कुणाला कर्ज मिळालेले नाही.
भेटायचे कुणाला..?बँकेत कोणही जबाबदार अधिकारी भेटत नाही. लिपिक काम करणारे दहा ते बारा तरुण असतात. तेही सतत बदलतात. साहेब दिल्लीला गेले होते. त्यामुळे कर्जमंजुरी लांबली असल्याचे कारण बँकेतील लोक देत आहेत. त्यामुळे दाद मागायची कुणाकडे? असा प्रश्न लोकांना पडला आहे.