गणपती कोळी -- कुरुंदवाड -कर्नाटक-महाराष्ट्र राज्याला जोडणारा दूधगंगा नदीवरील दत्तवाड-एकसंबा बंधारा सीमाभागाला एक वरदान म्हणून लाभले आहे. मात्र, सध्या येथील नदीपात्रात पाण्याचा तुटवडा आहे. त्यामुळे बंधाऱ्याला बरगे घालून पाण्याची बचत करण्याबरोबरच सुरळीत पाणीपुरवठा करण्याची गरज निर्माण झाली आहे.यावर्षी पाणीटंचाई असताना दत्तवाड बंधाऱ्याला बरगे नसल्यामुळे नदीतील पाणी थेट कर्नाटकात वाहून जात आहे. त्यामुळे दत्तवाड, नवे दानवाड, जुने दानवाड, घोसरवाड, मडिकवाड, एकसंबासह परिसरातील गावांना पिण्याच्या व शेतीच्या पाण्याच्या प्रश्न गंभीर बनला असून, पाण्यावरून सीमाभागातील गावांत असंतोष निर्माण होण्याची शक्यता आहे. यावर्षी काळम्मावाडी धरणामध्ये ७५ टक्के पाणीसाठा शिल्लक असला तरी उन्हाळ्यात पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे.दूधगंगा नदीवरील दत्तवाड बंधारा हा महाराष्ट्रातील शेवटचा बंधारा असून, ती नदी पुढे कर्नाटकात यडूर येथे कृष्णा नदीस मिळते. त्यामुळे दत्तवाड बंधारा दुरुस्त करून बरगे घालण्याची गरज निर्माण झाली आहे. गेल्या आठ वर्षांत शासनाने या बंधाऱ्याकडे दुर्लक्ष केले आहे. हा बंधारा शासनाकडे हस्तांतर केला होता त्यावेळी अधिकाराऱ्यांकडून याची पाहणी झाली होती. मात्र, बरग्यांची पाहणी केली नव्हती. पाटबंधारे विभागाने या बंधाऱ्याला त्वरित बरगे घालून दुष्काळसदृश परिस्थितीत पाणी अडवून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा; अन्यथा परिसरातील शेतकऱ्यांना घेऊन आंदोलन करण्यात येईल.- बबनराव चौगुले, माजी सरपंच - दत्तवाड.
दत्तवाड बंधाऱ्याला बरगे घालण्याची गरज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2015 9:01 PM