संदीप आडनाईक
कोल्हापूर : भुयेवाडीजवळ एक युवक गव्याच्या हल्ल्यात ठार झाला आणि पुन्हा एकदा मानव आणि वन्यप्राण्यांमधील संघर्ष उफाळून आला आहे. गवेच काय, पण हत्ती, बिबट यासारखे वन्यप्राणी मानवी वस्तीत येणे आता नवीन राहिले नाही. माणसांचे जंगल परिसरातील वाढते अतिक्रमण पाहता आता आपल्याला या वन्यप्राण्यांसह राहावे लागेल. त्यामुळे गव्याला स्वीकारा. थोडा संयम बाळगा.
जंगलात राखीव गवताळ परिसराची गरज
गव्यासारख्या वन्यप्राण्यांविषयी शहरातील आणि ग्रामीण भागातील नागरिकांचे नेमके प्रबोधन करणे गरजेचे आहे. अन्यथा अशा प्राण्यांमुळे होणारे अपघात, जीवित हानी वाढेल आणि पुन्हा त्यांच्याबरोबरचा संघर्ष पेटू शकतो. वनविभागाने जंगलात बफर झोनमध्येच त्यांना खाद्य उपलब्ध होईल, असे राखीव गवताळ शेतीक्षेत्र तयार केले पाहिजे. नैसर्गिक तसेच कृत्रिम पाणवठ्याची व्यवस्था केली पाहिजे. त्यांच्यासाठी ग्रीन फेन्सिंग निर्माण केले पाहिजेत, तरच ते तेेथून शहरात येण्याचे थांबतील.
बघ्यांची गर्दी, पाठलाग, डिवचणे घातक
अतिशय महाकाय पण लाजाळू असणाऱ्या गव्यांना कोल्हापूर जिल्ह्यात सध्या शेतातील ऊस, मका आणि पाण्याच्या शोधात शहरापर्यंत यावे लागत आहे, हे समजून घ्यायला हवे. त्यामुळे गावातील, शहरातील प्रवेशानंतर त्यांच्या पाठीमागे होणारी बघ्यांची गर्दी, पाठलाग, त्यांना डिवचणे हे सर्व प्रकार घातक आहेत. अशा गर्दीमुळे, पाठलाग केल्यामुळे, सततच्या धावण्यामुळे घाबरल्यामुळे गव्यांच्या स्नायूंमध्ये मोठ्या प्रमाणात रक्तस्राव होतो. जास्त धावल्याने रक्तस्राव वाढून ‘कॅप्चर मायोपॅथी’मुळे ती दगावतात. पुष्कळ वेळा असे तणावग्रस्त प्राणी पशुवैद्यकाच्या मदतीने बेशुद्ध करणे व त्याच्यावर ताबा मिळवणे कठीण बनते. त्यांना योग्य मात्रेत भुलीचे औषध देऊनदेखील ते बेशुद्ध होत नाहीत. पण जास्तीच्या तणावामुळे व ‘कॅप्चर मायोपॅथी’ मरण पावले तर तो दोष पशुवैद्यकाच्या माथी मारला जातो.
म्हणून सुटला त्यांचा मूळ अधिवास
कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी अभयारण्य हे मूळ अधिवास असलेला हा प्राणी जिल्ह्यातील आजरा, कागल, राधानगरी, भुदरगड, पन्हाळा, करवीर तालुक्यात सातत्याने दिसतो. म्हशीप्रमाणेच रवंथ करणारा गवा सकाळी, पहाटे किंवा सायंकाळी उशिरा चरायला बाहेर पडतो. त्याला मका, उसाच्या लावणीवरील कोंब, गवत, झाडपाला, कोवळ्या फांद्या विशेषतः कोवळे बांबू खायला आवडतात. विशेषत: त्यांना मीठ, खारट माती, खडक चाटायला आवडते. त्यामुळे रासायनिक खते वापरून खारफुटी वाढलेल्या शेतांमध्येही या गव्याचा वावर वाढलेला आढळत आहे. शिवाय वाघ आणि बिबट्या यांची संख्याही कमी झाल्याने गव्यांची संख्या वाढून ते आपल्या अधिवासाच्या बाहेर येत आहेत.
समंजसपणा गरजेचा
खरंतर कोल्हापुरात आलेला गवा तीन-चार दिवसांपासून जवळच्या शेतात आणि मानवी वस्तीत मुकाटपणे वावरत होता. अगदी शिवाजी पुलावर आजूबाजूला वाहने जात असतानाही त्याने कोणालाही इजा केलेली नव्हती. पण बघ्यांच्या गर्दीमुळे आणि तरुणांच्या उत्साहामुळे तो पळून पळून आक्रमक झाला. यात एकाचा बळी गेला. हा संघर्ष टाळण्यासाठी आता माणसालाच त्याच्याबद्दल समजून घ्यावे लागेल, वन्यजीव वाचवले पाहिजेत.