कोल्हापूर : मराठा आरक्षणाला मिळालेल्या तात्पुरती स्थगितीमुळे शासकीय आणि खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थांच्या (आयटीआय) प्रवेश प्रक्रियेत सध्या तरी कोणताही बदल होणार नाही. मात्र, कोल्हापूरमधील इयत्ता अकरावीची केंद्रीय प्रवेश प्रक्रिया स्थगित करण्यात आली आहे.
वैद्यकीय अभ्यासक्रमांसह शिवाजी विद्यापीठातील पारंपरिक विद्याशाखांच्या पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांची प्रक्रिया अद्याप प्राथमिक टप्प्यावर असल्याने परिणाम होणार नाही.मराठा समाजासाठी मिळालेल्या सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्ग प्रवर्गातून (एसईबीसी) आरक्षणास (एसईबीसी) तात्पुरती स्थगिती मिळाली आहे. त्यामुळे विविध प्रवेश प्रक्रियेवर कोणता परिणाम होणार याचा लोकमतने आढावा घेतला. त्यात आयटीआयची प्रवेश प्रकिया सध्या सुरू आहे, त्याप्रमाणेच कायम ठेवण्याची सूचना शासनाच्या व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाने केली असल्याची माहिती कळंबा येथील आयटीआयचे प्राचार्य रवींद्र मुंडासे यांनी दिली.
शिक्षण संचालनालयाने केलेल्या सूचनेनुसार कोल्हापूर शहरातील अकरावीची प्रवेश प्रक्रिया स्थगित करण्यात आली आहे. या संचालनालयाच्या सूचनेनुसार प्रवेश प्रक्रियेबाबत पुढील कार्यवाही कोल्हापूर विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडून केली जाणार आहे.
अंतिम सत्राच्या परीक्षा झालेल्या नसल्याने शिवाजी विद्यापीठातील पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या शिक्षणाची प्रक्रिया अद्याप सुरू झालेली नाही. वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठीच्या ह्यनीटह्ण (नॅशनल इलिजिबिलिटी कम एंट्रन्स टेस्ट) परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर शासकीय महाविद्यालयांतील गुणवत्ता यादी प्रसिध्द होणार आहेत. अभिमत विद्यापीठांच्या वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये आरक्षणाचा मुद्दा येत नाही.
शासकीय आणि खासगी तंत्रनिकेतनमधील (पॉलिटेक्निक) पदविका प्रथम वर्ष अभ्यासक्रमासाठी ऑनलाईन अर्ज करण्यास दि. २१ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ मिळाली आहे. त्यामुळे या आरक्षणाला मिळालेल्या तात्पुरती स्थगितीचा सध्या तरी प्रक्रियेवर काही परिणाम होणार नसल्याचे चित्र आहे.
मराठा समाजातील विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्यासाठी राज्य शासनाने नव्याने आरक्षणाचा अध्यादेश काढावा. विविध शैक्षणिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशाबाबत सध्या संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. त्याबाबतही लवकर स्पष्टीकरण द्यावे.-इंद्रजित सावंत, अभ्यासक, मराठा समाज
अकरावीच्या ११८७ विद्यार्थ्यांचा जीव टांगणीलाकोल्हापूर शहरातील अकरावी प्रवेशासाठी एसईबीसी आरक्षणाअंतर्गत एकूण ११८७ विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत. त्यात विज्ञानचे ८०३, वाणिज्य इंग्रजी माध्यमाचे १४७, मराठी माध्यमाचे १४०, कला मराठी माध्यमाचे ९५, तर इंग्रजी माध्यमाच्या दोन विद्यार्थ्यांचा समावेश आहे. आरक्षणाला तात्पुरती स्थगिती मिळाल्याने आणि प्रवेश प्रक्रिया लांबणीवर पडल्याने या विद्यार्थ्यांचा जीव टांगणीला लागला आहे...तर बदल होण्याची शक्यताजर तात्पुरती स्थगिती मिळण्यापूर्वी एखाद्या अभ्यासक्रमासाठी या आरक्षणानुसार प्रवेश दिला असेल आणि ही स्थगिती कायम राहिल्यास या प्रवेशित विद्यार्थ्यांचा जनरल मेरिटमध्ये समावेश करावा लागणार असल्याची शक्यता आहे.