कोल्हापूर : पाचशे व दोन हजार रुपयांच्या नोटांचा रंग उडत असल्याच्या तक्रारी काही जिल्ह्यांत झाल्या असल्या तरी कोल्हापूर जिल्ह्यात मात्र अशी एकही तक्रार झाली नसल्याची माहिती बँक वर्तुळातून देण्यात आली. २०१६/१७ मध्ये दोन हजारच्या नवीन नोटा आल्या तेव्हा सुरुवातीच्या काळात या नोटांचे रंग जातात अशा तक्रारी होत्या. वस्तुस्थितीही तशीच होती. पण नंतर आलेल्या नोटांचा रंग जाण्याचा बंद झाला. त्यानंतर पाचशेच्या नवीन नोटा आल्या. त्या थोड्या हिरवट फिकट रंगाच्या होत्या. मात्र, या नोटांचा रंग जात नव्हता.
मुळातच सध्या असलेल्या पाचशे व दोन हजार रुपयांच्या नोटांचा रंग फिकट आहे. शिवाय त्याचा कागदही तुलनेत काहीसा पातळ आहे. दोन हजाराच्या नोटांपेक्षा पाचशे रुपयांच्या नोटांचा तर रंग जास्तच फिकट आहे. अशा नोटा सातत्याने हाताळल्यामुळे त्या काहीशा काळपट पडतात. मात्र, त्यांचा रंग जात नाही. काही कारणाने चुकून भिजलेल्या नोटांचाही रंग फिका होतो. परंतु लोकांना या नोटांचा रंग गेला असे वाटते आणि त्यातून काही ठिकाणी तक्रारी झाल्या असाव्यात. बनावट नोट असल्यास त्याचा रंग हाताला लागतो, असे एका बँक अधिकाऱ्याने सांगितले.
कोट :
पाचशे व दोन हजारच्या नोटांचा रंग जातो, अशी एकही तक्रार कोल्हापुरातील अग्रणी बँकेकडे अद्याप तरी आलेली नाही. त्यामुळे नागरिकांनी घाबरण्याचे कोणतेही कारण नाही.
राहुल माने
व्यवस्थापक, अग्रणी बँक, कोल्हापूर.
कोट :
सध्या चलनात असलेल्या पाचशे व दोन हजार रुपयांच्या नोटांचा कागद तुलनेत पातळ आहे. तसेच या नोटा काहीशा फिकट आहेत. मात्र, या नोटांचा रंग जात नाही ही वस्तुस्थिती आहे. या नोटा फिकट असल्याने त्या मळल्यासारख्या वाटतात. त्यामुळे एखाद्याला या नोटांचा रंग गेला असेल असे वाटते.
सूर्यकांत कर्णिक,
बँक ऑफ महाराष्ट्र, युनियन सेक्रेटरी.
चौकट:
२५ लाखाच्या नोटा दिल्या बदलून...
मध्यंतरी नुकताच रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया व बँक ऑफ इंडियाच्यावतीने ग्राहकांसाठी कॉईन मेळावा घेण्यात आला. जीर्ण,फाटक्या नोटा ग्राहकांना बदलून देण्यात आल्या. या मेळाव्यात एकाही ग्राहकाची नोटांचा रंग फिका झाला आणि ती बदलून द्या म्हणून तक्रार आली नव्हती.
चौकट
एकदम गडद दोनशेची नोट...
पाच, दहा, वीस, पन्नास, शंभर, दोनशे, पाचशे व दोन हजार अशा सर्व नोटा वेगवेगळ्या रंगाच्या आहेत. मात्र सर्वात जास्त भगव्या गडद रंगाची नोट दोनशे रुपयांची आहे. या सर्व नोटात दोनशे रुपयांची नोट ठळकपणे उठून दिसते.