आजरा : उचंगी धरणग्रस्तांच्या पुनर्वसनाबाबत बैठकीत कोणताही ठोस निर्णय नाही. फक्त आश्वासने दिली. आश्वासनाऐवजी प्रत्यक्षात काम करा अन्यथा: धरणाचे काम सुरू करण्यास धरणग्रस्तांचा विरोध आहे. असे सांगत उचंगी धरणग्रस्तांनी आज धरणाचे काम बंद पाडले.
धरणाच्या सांडव्याचे काम चालू आहे. ते काम बंद करण्यास पाटबंधारेच्या अधिकाऱ्यांनी भाग पाडले. धरणग्रस्तांच्या पुनर्वसनाशिवाय काम करू नये. मागण्यांची पूर्तता करा, मगच धरणाचे काम सुरू, अशा सूचना धरणग्रस्तांनी यावेळी दिल्या. धरणस्थळावर आंदोलक मोठ्या संख्येने जमा झाले होते.
पुनर्वसनाचे प्रश्न वेळेत संपविले जात नसल्याने गेली २१ वर्षे धरणाचे काम खोळंबले आहे. धरणाच्या कामाला धरणग्रस्तांचा विरोध नाही, पण धरणाच्या कामाबरोबर पुनर्वसनाचे काम झालेच पाहिजे ते होत नाही. बैठकांमध्ये फक्त आश्वासने दिली जातात. त्याचे पालन केले जात नसल्याच्या आरोप यावेळी धरणग्रस्तांनी केला. पाटबंधारे विभागाचे अधिकारी अमोल नाईक यांना मागणीचे निवेदन देऊन धरणाचे काम धरणग्रस्तांनी बंद पाडले.
संकलन रजिस्टरबाबत शिबिरे घेण्याऐवजी तातडीने दुरुस्त करा. धरणाची उंची दोन मीटरने वाढविलेमुळे जमीन संपादन करण्यात यावी, जमीन नाकारलेल्या धरणग्रस्तांना लाभक्षेत्रात जमीन मिळावी, २००७ पूर्वी अर्ज केलेल्या धरणग्रस्तांची ६५ टक्के रक्कम भरून घेण्यात यावी. जमीन वाटपाचे आदेश झालेल्या धरणग्रस्तांना जमिनीचे वाटप करावे, भुईभाडे व ६५ टक्के रकमेवरील व्याज तातडीने मिळावे. यासह अन्य मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
यावेळी संजय तर्डेकर, दत्तात्रय बापट, सुरेश पाटील, निवृत्ती बापट, शिवाजी बापट, संजय भडांगे, प्रकाश मणकेकर, मारुती चव्हाण यासह धरणग्रस्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
फोटो ओळी : उचंगी धरणाचे काम बंद पाडून पाटबंधारे अधिकारी अमोल नाईक यांचेकडे निवेदन देताना धरणग्रस्त.
क्रमांक : १८०३२०२१-गड-०२
-
फोटो ओळी : सांडव्याचे काम बंद पाडल्यानंतर परिसरात शुकशुकाट जाणवत होता.
क्रमांक : १८०३२०२१-गड-०३