कोल्हापूर : ‘अच्छे दिन’ म्हणजे चुनावी जुमला असल्याचे खुद्द भाजपचेच ज्येष्ठ नेते सांगत आहेत; त्यामुळे भाजप सरकारच्या कार्यकाळात एकही घटक समाधानी नसून महागाईसह विविध प्रश्नांमुळे जनता निराश असल्याची टीका कॉँग्रेसच्या पश्चिम महाराष्टÑ सहप्रभारी सोनल पटेल यांनी मंगळवारी येथे केली. लोकसभा विधानसभा निवडणुकीसाठी कार्यकर्त्यांची प्रशिक्षित फौज शिबिराच्या माध्यमातून तयार करण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले.फुलेवाडीतील अमृत हॉलमध्ये कॉँग्रेसतर्फे आयोजित दोन दिवसीय संवाद कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिराप्रसंगी त्या बोलत होत्या. महापौर शोभा बोंद्रे, प्रदेश सरचिटणीस आमदार रामहरी रुपणवार, प्रवक्ते हरिष रोगे, यशवंत हाप्पे, जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील, आमदार सतेज पाटील, माजी खा. कल्लाप्पाण्णा आवाडे, जयवंतराव आवळे, माजी मंत्री भरमू पाटील, प्रकाश आवाडे, माजी आमदार संजीवनीदेवी गायकवाड, शहराध्यक्ष प्रल्हाद चव्हाण, मुख्य प्रशिक्षक राजीव साहू, प्रशिक्षक चैतन्य रेड्डील राजेंद्र वानखेडे,आदीं प्रमुख उपस्थित होते.पटेल म्हणाल्या, ‘देशाच्या इतिहासातील राफेल हा आतापर्यंतचा मोठा घोटाळा असून लोकांमध्ये सरकारविरोधात चीड निर्माण झाली आहे. राहुल गांधी हे राष्टÑीय अध्यक्ष झाल्यापासून त्यांनी कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिराचा आग्रह धरला होता. त्यानुसार हे प्रशिक्षण शिबिर घेतले जात असून, यानंतर प्रत्येक ब्लॉकमध्ये ते घेतले जाणार आहे.पी. एन. पाटील म्हणाले, राज्यातील भाजप सरकारच्या १२ मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत; परंतु त्यांचे राजीनामे घेतलेले नाहीत. पाकिस्तानला धडा शिकवू म्हणणारे या सरकारमधील लोक त्या ठिकाणी केक कापायला जातात, तर माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्रींनी पाकिस्तानचे रणगाडे कापायला लावले होते.सतेज पाटील म्हणाले, राहुल गांधींना अभिप्रेत बूथ टू बूथ व घर टू घर या मोहिमेद्वारे लोकांशी संपर्क साधण्यावर भर दिला जाणार आहे. यासाठी या प्रशिक्षणाचा चांगला उपयोग कार्यकर्त्यांना होणार आहे.शिरोळचा विजय एकीचा..सर्व पुरोगामी विचारांचे पक्ष, संघटना एकत्र आल्यानेच शिरोळ नगरपालिकेत जातीयवादी पक्षांचा पराभव झाला आहे. ही सुरुवात असून अशाच पद्धतीने इथून पुढेही आघाडी राहण्यासाठी प्रदेश पातळीवर चर्चा सुरू असल्याचे सतेज पाटील यांनी सांगितले.
भाजप सरकारवर एकही घटक समाधानी नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2018 1:02 AM