शिवानंद पाटील। गडहिंग्लज
गडहिंग्लज तालुक्यातील ८९ पैकी १७ गावांत स्मशान शेडची सुविधा उपलब्ध नाही. एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याच्यावर अंत्यसंस्कार करताना नातेवाईक आणि गावकऱ्यांची मोठी कुचंबणा होत आहे. त्यामुळे लोकप्रतिनिधी आणि गावातील प्रमुख मंडळींनी एकत्र बसून यावर उपाययोजना शोधावी, अशी संबंधित गावखेड्यातील जनतेची मागणी आहे. प्रत्येक गावात विविध जाती-धर्मातील मृत व्यक्तींच्या अंत्यसंस्कारासाठी दहन व दफन विधीसाठी सार्वजनिक व खासगी जागा राखून ठेवण्यात आल्या आहेत. परंतु, मृतदेहांच्या दहनासाठी तालुक्यातील १७ गावांत अद्याप स्मशान शेडची सुविधा उपलब्ध नसल्याची माहिती पुढे आली आहे. स्मशानशेड उपलब्ध असलेल्या काही गावांत दिवाबत्ती, पाणी व रस्त्याची सोय नाही. त्या गावांतील नागरिक आणि मृतांच्या नातेवाईकांची गैरसोय होत आहे. म्हणून नदी-ओढ्यांच्या काठावर किंवा पाणंद रस्त्यांच्या बाजूला उघड्यावरच मृतांवर अंत्यसंस्कार करण्याची वेळ येत आहे. कोरोनाच्या संसर्गामुळे गडहिंग्लज, आजरा व चंदगड या तालुक्यांसह सीमाभागातील कोरोनामुळे निधन झालेल्या व्यक्तींवरील अंत्यसंस्कारावेळी स्मशानशेडचा प्रश्न प्रकर्षाने पुढे आला आहे. त्यामुळे प्रत्येक गावात स्मशान शेडची सुविधा निर्माण करणे ही काळाची गरज असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे एक मूलभूत जनसुविधा म्हणून त्यासाठी प्रयत्न आणि पाठपुरावा करण्याची गरज आहे.
या गावांत नाही स्मशानशेड... चन्नेकुप्पी, अर्जुनवाडी, बिद्रेवाडी, हसूरवाडी, दुगूनवाडी, जांभूळवाडी, काळमवाडी, कुंबळहाळ, माद्याळ कानूल, तावरेवाडी, शिंदेवाडी, तेगिनहाळ, तारेवाडी, यमेहट्टी, शिप्पूर तर्फ आजरा (दगडी शिप्पूर), मांगनूर तर्फ सावतवाडी.
संबंधित ग्रामपंचायतींकडून स्मशान शेडसंदर्भातील माहिती मागविण्यात आली आहे. बांधकाम विभागाकडून त्याचे आराखडे तयार करून घेऊन जनसुविधा योजनेंतर्गत स्मशानशेड बांधकामाचे प्रस्ताव जिल्हा परिषदेकडे सादर करण्यात आले आहेत. त्याला मंजुरी मिळताच लवकरात लवकर कामाला सुरुवात करण्यात येईल.
- शरद मगर, गटविकास अधिकारी, गडहिंग्लज.
दुंडगे (ता. गडहिंग्लज) येथे हिरण्यकेशी नदीकाठानजीक स्मशानशेड उभारण्यात आले आहे. परंतु, त्या शेडपर्यंत जाण्यासाठी रस्त्याची सोय नाही. पावसाळ्यात त्याठिकाणी पायी चालतदेखील जाता येत नाही. त्यामुळे ओढ्याच्या काठावर पर्यायी स्मशानशेड उभाे करण्याची गरज आहे.
- उदय तेलवेकर, युवा कार्यकर्ता, दुंडगे.
-