संतोष पाटील ल्ल कोल्हापूर भेदरलेल्या नजरा... भिंतीला पडलेली मोठी भगदाडे... दारात विस्कटलेले साहित्य... उद्ध्वस्त झालेल्या इमारती... देखण्या शोरूम्स्ची उचकटलेली दारे... सर्वत्र भयाण शांतता... ही परिस्थिती कुठल्या युद्धजन्य भागातील नसून गांधीनगर या जिल्ह्याच्या व्यापारी केंद्राच्या प्रवेशद्वाराची आहे. व्यापारात नेमके गणित मांडणारे ‘सेटलमेंट’च्या मायाजालात फसून स्वत:च्या पायावर कसे धोंडा मारून घेतात, याचे उदाहरणच महापालिकेच्या ऐतिहासिक अतिक्रमणविरोधी कारवाईने दाखवून दिले. या कारवाईमुळे गांधीनगरचे ‘नाक’ गेल्याची चर्चा आहे. तावडे हॉटेल ते गांधीनगर रस्त्यावरील २५ एकरापेक्षा अधिक जमीन महापालिकेच्या मालकीची आहे, ही बाब न्यायालयात सिद्ध होण्याअगोदर गॅझेटमध्येही नोंदविली गेली आहे. मोक्याची जागा कवडीमोलाने मिळतेना पुढचे पुढे पाहूया, या अस्सल व्यापारीवृत्ती दाखवत या जमिनीवर अवैध इमारतींचे मजलेच्या मजले उभारले. इमारतींच्या चौकशीचा पाया कोणी खणलाच तर रुपयांच्या छनछनाटात आवाज बंद केला जायचा. अशाप्रकारे सेंटलमेंटच्या फंड्यात चार-पाच वर्षांत संपूर्ण परिसरच सिमेंटच्या जंगलात झाकून गेला. गांधीनगर कोल्हापूर शहराला जोडल्याचा भास निर्माण झाला. आपला पाया ठिसूळ आहे, असू देत ‘क ोनो फरक पडे छूँ’ पैशांच्या जोरावर यंत्रणा खरेदी करू शकतो या मग्रुरीमुळे येथील व्यावसायिकांनी अनर्थ ओढावून घेतला. सुरुवातीस आमचा अन् महापालिकेचा संबंधच नाही, अशीच भूमिका घेत येथील मिळकतधारकांनी थेट आव्हान दिले. काही वर्षांपूर्वी एका कारभार्याने बांधकामे नियमितीकरणाची ५० लाखांची मागितलेल्या सुपारीकडेही दुर्लक्ष केले गेले. त्यानंतर न्यायालयात टिकाव लागणार नाही म्हटल्यावर वर्गणी काढून अनेकांना ‘लक्ष्मी दर्शन’ करवण्यात आले. तोपर्यंत महापालिकेच्या चौकात ‘कोणी किती खाल्ले’ याची आकडेमोड सुरू होऊन कुरघोड्यांचे राजकारण सुरू झाले होते. न्यायालयाच्या पहिल्या टप्प्यात मात खाऊनही प्रशासनास ठोस कागदपत्रे देऊन निकाल फिरविण्याची किमया काहींनी करून दाखविली. न्यायालयाच्या निकालाच्या आधारे महापालिके ची अस्मिता जागी करण्यात नगरसेवक व प्रशासनातील एक गट यशस्वी झाला. प्रत्यक्ष अतिक्रमण हटविण्यची कारवाई सुरू झाल्यानंतर पाहणीच्या निमित्ताने येणार्या प्रत्येकाचा काही ना काही उद्देश होताच. काहींना व्यापार्यांना ‘मी आहे काळजी करू नका.’ असे भासवायचे होते तर काहींना ‘आम्हाला कमी लेखले काय, आता बघाच आमची ताकद’ असे हिणवायचे होेते. यामध्ये जकात नाक्यावर त्रास सहन केलेल्या कारकुनापासून कारभार्यांपर्यंत अनेकांचा सहभाग होता. महापालिकेची जागा परत मिळाली पाहिजे अशी प्रमाणिक इच्छा असणार्यांची संख्याही लक्षणीय होती ही बाब वेगळी. चार दिवसांपूर्वी गर्दीने फुललेली दुकाने या रस्त्यावरील आज स्मशानासम झाली आहेत. चारप्रहरी पहारा असलेली मालाने भरलेली गुदामेच आज उघड्यावर पडली आहेत. कोट्यवधीच्या मिळकती व मालाची जेसीबीच्या धक्क्याने चक्काचूर झाला. पैशांने सर्व काही खरेदी करता येते अगदी यंत्रणासुद्धा खिशात घालता येते या अति व फाजील आत्मविश्वासामुळे गांधीनगर परिसरातील व्यापार्यांचा घात केला.
‘क ोनो फरक पडे छूँ’! गांधीनगर अतिक्रमणमुळे नाक गेलं ! :
By admin | Published: May 29, 2014 1:13 AM