कोल्हापूर : दूध दर आंदोलनप्रश्नी चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री किंवा त्यांच्या कार्यालयाकडून चर्चेचा कोणताही प्रस्ताव अथवा त्यांच्याकडून कोणताही संपर्क झालेला नसल्याचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी सांगितले. आम्ही चर्चेला बोलवत आहे; परंतु संघटना किंवा शेट्टीच त्यासाठी तयार नाहीत, असा बुद्धिभेद करीत असल्याची टीका शेट्टी यांनी केली आहे. आम्ही कायमच चर्चेला तयार असतो व चर्चेतूनच प्रश्न सुटतात यावर संघटनेचा विश्वास असल्याचे शेट्टी यांनी म्हटले आहे.मुंबईचा दूध पुरवठा बंद व्हावा यासाठी शेट्टी सोमवारी रात्रीपासून पालघर व ठाणे जिल्ह्यांत ठाण मांडून बसले आहेत. सोमवारी पहिलाच दिवस असल्याने ग्राहकांना फारसा फटका बसला नाही तरी बुधवारपासून दुधाची टंचाई जाणवणार आहे. आंदोलनास सर्वत्रच प्रतिसाद असून, शेतकऱ्यांनी थोडी कळ सोसावी, असे आवाहन शेट्टी यांनी केले. एरव्ही कोणत्याही प्रश्नावर प्रतिक्रिया देणारे नेते आता मूग गिळून गप्प असल्याची टीका स्वाभिमानी संघटनेने केली आहे.सदाभाऊंचे आगीत तेल...गाय दुधाच्या दरवाढीसाठी राज्यभर आंदोलन पेटले असताना त्यात कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी आगीत तेल ओतले. सदाभाऊ यांनी या आंदोलनात दुधात पाणी मिसळून रस्त्यावर ओतले जात असल्याची टीका दुपारी केली. त्यामुळे दूध उत्पादकांतून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त झाली. सदाभाऊंनी आंदोलनाची अशी कुचेष्टा केल्यास त्यांना हाच शेतकरी धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही कार्यकर्त्यांनी दिला.
मुख्यमंत्र्यांकडून चर्चेचे निमंत्रणच नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2018 1:05 AM