अमर पाटील -कळंबा --अवघ्या काही दिवसांवर पावसाळा येऊन ठेपला आहे. कळंबा तलावातील गाळाच्या उठावाचा मंदावलेला वेग विचारात घेतला तर पावसाळ्यापूर्वी तलाव पूर्णपणे गाळमुक्त होणे अशक्यप्राय आहे. गाळ उपशात नियोजनाचा अभाव, तोकडी यंत्रणा यामुळे तलावात बराचसा गाळ शिल्लक राहण्याची चिन्हे दिसत आहेत. तर दुसरीकडे सुशोभीकरणाचे काम करणाऱ्या ठेकेदाराने फक्त संरक्षक भिंतीची काही कामे पूर्ण केली आहेत. त्यामुळे सांडवा दुरुस्ती, बंधारा मजबुतीकरण व दुरुस्ती, मनोरा दुरुस्ती, जनावरे धुण्याचा हौद, सौरऊर्जा दिवे ही पावसाळ्यापूर्वी करायची तलावासंबंधीची महत्त्वाची कामे अपूर्णच राहिली आहेत. त्यामुळे कळंबा तलावाच्या सुशोभीकरणाचे नियोजनाअभावी तीन तेरा झाले आहेत. डिसेंबर महिन्यात तलावात मृत पाणीसाठा चार फूट होता. बाकी कोरडा गाळ शिल्लक होता. तलावाविषयी असणाऱ्या आस्थेने लोकसहभागातून गाळ उठाव मोहिमचा प्रारंभ त्याचवेळी करणे गरजेचे होते. परंतु, प्रत्यक्षात गाळ उपसा मोहिमेस प्रारंभ व्हायला १५ मार्च उजाडला. दोन कोटींच्या विशेष निधीसह जलयुक्त शिवार अभियानांतर्गत जलसंपदा यांत्रिकी विभागाने सुरुवातीस १ एक्साविटर व १ डोझर उपलब्ध करून दिला. ज्यामुळे गाळ उपसा वाढला; पण गाळ भरून नेण्यासाठी ट्रॅक्टर, डंपरची सोय पालिका, ग्रामपंचायतींसह कोणत्याच प्रशासनाने न केल्याने गाळ उठावात शिथिलता आली आहे. आजअखेर जरी ४५ हजारांवर डंपर, ट्रॉली गाळ काढण्यात आला असला तरी तेवढाच गाळ काढण्याचे काम शिल्लक आहे. आतापर्यंत केलेल्या गाळ उपशातून पाणीपातळी दहा फुटांनी वाढणार असल्याने दोन दशलक्ष घनफूट पाणीसाठा यंदा वाढेल, असा पाटबंधारे विभागाचा अंदाज आहे. तरीही अजून गाळ उपसा करणे गरजेचे आहे. जैव प्राधिकरण समिती, निसर्ग व पर्यावरणप्रेमींनी तलावास भेट देऊन तलावाच्या बंधाऱ्यापासून दीडशे फूट अंतर राखून एकसारखा सलग गाळ उपसा करण्याच्या सूचना केल्या होत्या. पाण्याच्या नैसर्गिक स्त्रोतांना बाधा येऊ न देण्याविषयीही सांगितले होते, पण गाळ उपशावर कोणाचेही नियंत्रण नसल्याने कोणीही कसाही गाळ उपसा केला आहे. त्यामुळे मनोऱ्यालगत पूर्वेस अर्ध्या तलावात गाळ अजून तसाच शिल्लक आहे. लोकसहभागातून तसेच कळंबा तलावाशी संबंधित सर्वच प्रशासनाने ट्रॅक्टर, डंपरची सुविधा उपलब्ध करून दिल्यास दोन शिफ्टमध्ये काम करण्याचीही जलसंपदा विभागाची तयारी आहे. एक एक्साविटर, व्हील लोडर, तीन डोझर, दहा जेसीबी मशिन्स, खासगी जेसीबी यांच्या साहाय्याने गाळ उपसा होतो. मात्र, उठावाची यंत्रणाच तोकडी असल्याने पावसाळ्यापूर्वी तलाव गाळमुक्त करण्याच्या मोहिमेस खो बसत आहे. सुशोभीकरण काम सुरूचनिविदाधारक कंपनीनेही नोव्हेंबर महिन्यात काम सुरू केले. मात्र, त्या कंपनीने सायकल ट्रॅक, योगा केंद्र, संरक्षक भिंत, प्रवेशद्वार ही कामे करण्यात धन्यता मानली. वास्तविक पावसाळ्यापूर्वी तलावाभोवती वनसंपदा निर्माण करण्यासाठी खड्डे काढणे, विविध वृक्षांच्या वनौषधी प्रजातींची उपलब्धता करणे, सांडव्याची दुरुस्ती करणे, सौरऊर्जा दिवे उभारणे, ढासळलेला मनोरा दुरुस्ती, बंधारा मजबुतीकरण, जनावरांचा धुण्याचा हौद, गणेश विसर्जन कुंड उभारणी ही कामे महत्त्वाची होती. कळंबा तलाव कोरडा पडल्यानंतर गेल्या दोन महिन्यांपासून गाळ काढण्याचे काम सुरू आहे. परंतु या कामात नियोजनाचा अभाव असल्याने मनोऱ्यालगत पूर्वेस अर्ध्या तलावात गाळ तसाच शिल्लक आहे.
कळंब्यातील अपेक्षित गाळ उठाव नाही
By admin | Published: May 19, 2016 11:44 PM