कोल्हापूर : सेवानिवृत्त सहाय्यक लेखाधिकारी प्रवीण होगाडे यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी संजय राजमाने यांच्याविरोधात केलेल्या तक्रारीत कोणतेही तथ्य नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
आपल्याला कारवाईची भीती घातल्याने आपण स्वेच्छानिवृत्ती घेतली असून, यासाठी राजमाने जबाबदार असल्याचा आरोप होगाडे यांनी केला होता. याप्रकरणी ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक डाॅ. रवी शिवदास यांची एकसदस्यीय चौकशी समिती नेमण्यात आली होती. डॉ. शिवदास यांनी चौकशी करून मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांना हा अहवाल सादर केला. त्यानुसार मित्तल यांनी याबाबतचा संक्षिप्त अहवाल पत्राद्वारे अध्यक्ष बजरंग पाटील यांना सादर केला. स्वेच्छानिवृत्ती घेण्याआधी तक्रार करण्याची संधी असतानाही होगाडे यांनी ती घेतली नाही. तसेच कोणताही ठोस पुरावा नसल्यामुळे त्यांच्या तक्रारीमध्ये तथ्य नसल्याचे या पत्रात म्हटले आहे.