कोल्हापूर : आमच्या कोणत्याही सभासदाने वाहनाची विक्री करताना वाहनांची किंमत कमी किवा जास्त दाखविण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. कारण वाहनांची किंमत केंद्र सरकारने निर्देशित केल्याप्रमाणे सरकारी पोर्टलवरून विक्री प्रमाणपत्र व बीजकमध्ये प्रमाणित केले जाते. काेणत्याही प्रकारचा मानवी हस्तक्षेप होत नाही, असे स्पष्टीकरण कोल्हापूर जिल्हा ऑटोमोबाईल डिलर्स वेल्फेअर असोसिएशनतर्फे विजय पाटील यांनी गुरुवारी केले. अंतर्गत लेखापरीक्षण गटाने दर्शविलेल्या त्रुटींशी आम्ही सहमत नाही, असेही त्यांनी म्हटले आहे.
परिवहन आयुक्त कार्यालयातर्फे कोल्हापूर प्रादेशिक परिवहन कार्यालयाने गेल्या चार वर्षांत नोंदणी केलेल्या ६१३ वाहनांच्या किंमती कमी वा जास्त दाखवून कर कमी केल्याचा ठपका ठेवला आहे. त्याबद्दल कोल्हापूर जिल्हा ऑटोमोबाईल डिलर्स वेल्फेअर असोसिएशन (काडा)ने असे म्हटले आहे की, आमच्या सर्व सभासदांनी वाहनांची विक्री करताना वाहनांची किंमत कमी वा जास्त दाखविण्याचा प्रश्न उद्भवत नाही. कारण वाहनांची किंमत केंद्र सरकारने निर्देशित केल्याप्रमाणे सरकारी पोर्टलद्वारे केली जाते. वाहनांची किंमत वाहन निर्मितीच्या ठिकाणाहून कोल्हापूरमध्ये येईपर्यंत वेगवेगळ्या दर व अंतरानुसार वेगवेगळी असते. शोरूममध्ये असलेल्या स्टाॅकमधील वाहनांच्या किमती किंवा शासनामार्फत वेळोवेळी वाढवल्या जाणाऱ्या करांमधील फरकाच्या किमतीमुळे काही वेळा शोरूममध्ये असलेल्या एकाच प्रकारच्या माॅडेलच्या दोन वाहनांच्या किंमतमध्ये फरक असू शकतो. अर्थात हा फरक नियमानुसारच असतो. ६१३ वाहनांच्या कमी कर आकारणी बाबत निर्मात्यांकडून वाहनांच्या किमतीची शहनिशा केली जात आहे. याबाबतचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर प्रादेशिक परिवहन अधिकारी व परिवहन आयुक्तांनाही पाठविला जाईल. अंतर्गत लेखापरीक्षण गटाने दर्शविलेल्या त्रुटींशी आम्ही सहमत नाही. कारण वाहनांची कर आकारणी कशी करावी, याबाबचे सुस्पष्ट निर्देश शासनाकडून २९ मे २०१७ ला राज्य शासनाच्या राजपत्र असाधारण भाग चारमध्ये प्रसिद्ध करण्यात आले आहेत. त्यानुसारच आम्ही कर आकारणी करीत आहोत.