कोल्हापूर : महानगरपालिकेच्या स्थायी समिती सभेला जर आयुक्त उपस्थित राहणार नसतील, तर यापुढे सभा घेतली जाणार नाही, असा इशारा बुधवारी झालेल्या सभेत सदस्यांनी दिला. स्थायी समितीच्या सभेत झालेल्या चर्चेनुसार प्रशासनाकडून अंमलबजावणी होत नसल्यामुळे सदस्यांनी हा इशारा दिला आहे. या सभेच्या अध्यक्षस्थानी सभापती मुरलीधर जाधव होते. स्थायी समितीच्या बुधवारच्या सभेस आयुक्त पी. शिवशंकर गैरहजर होते, त्यामुळे संतप्त झालेल्या सदस्यांनी त्यांना टार्गेट केले. प्रत्येक सभेत सदस्यांनी वारंवार प्रश्न मांडूनही प्रशासनाकडून कोणतीही कार्यवाही होत नाही. त्यामुळे पहिल्यांदा मागील सभेत झालेल्या चर्चेप्रमाणे कोणती कार्यवाही झाली ते प्रशासनाने सांगावे, असा आग्रह यावेळी सदस्यांनी धरला. सदस्यांनी मांडलेल्या समस्यांवर प्रशासनाकडून कोणतेच ठोस निर्णय घेतले जात नाहीत. आयुक्तांशी चर्चा करून निर्णय घेऊ, अशी उत्तरे दिली जातात. त्यामुळे आयुक्तांनी सभेला हजर राहावे, अन्यथा येथून पुढची सभा घेतली जाणार नाही, असा इशारा यावेळी देण्यात आला. या विषयावरील चर्चेत सत्यजित कदम, सुनील पाटील, अजित ठाणेकर, रूपाराणी निकम, जयश्री चव्हाण यांनी भाग घेतला. प्रभागातील कोणतीच कामे वेळेवर होत नाहीत. जेसीबी, बूम मिळत नाहीत, औषध फवारणी होत नाही. साधे साधे प्रश्नही मार्गी लागत नाहीत. त्यामुळे सदस्यांमध्ये गैरसमज होत आहेत. किरकोळ कामे होणार नसतील तर स्थायी समिती सभा कशाला घ्यायची, असा संतप्त सवाल सभापती मुरलीधर जाधव यांनी अधिकाऱ्यांना विचारला. यावर प्रशासनातर्फे कामे झटपट करण्याबाबत सर्व विभागप्रमुखांना पत्राद्वारे आदेश देण्यात येतील, असे सांगण्यात आले. यावेळी लक्ष्मीपुरी धान्य बाजार, तावडे हॉटेल परिसरातील अवैध बांधकाम, आदी विषयांवर नीलोफर आजरेकर, मेहजबीन सुभेदार, जयश्री चव्हाण, दीपा मगदूम, आदींनी भाग घेतला. (प्रतिनिधी) सत्यजित कदम : कंटेनर महागड्या दराने का घेणार ?स्थानिक कंपन्यांना कंटेनर खरेदीचे काम मिळू नये म्हणून कंटेनर खरेदीच्या निविदामधील अटी व शर्र्तींमध्ये बदल केला आहे. स्थानिक बाजारपेठेतील एका कंपनीने ३५ ते ३७ हजार रुपयांना कंटेनर देण्याची तयारी दर्शविली आहे. परंतु, मनपा अधिकाऱ्यांनी केलेल्या इस्टिमेटमध्ये कंटेनरचा दर हा ६५ हजार रुपये आहे. त्यामुळे महानगरपालिकेचे आर्थिक नुकसान होणार आहे. कोल्हापुरात चांगल्या प्रकारचे मटेरियल तयार होऊन देश-विदेशात पाठविले जात असताना मग बाहेरच्या कंपन्यांकडून कंटेनर का घेण्यात येत आहेत, अशी विचारणा सत्यजित कदम यांनी केली.
आयुक्त नसतील तर सभा नाही
By admin | Published: April 14, 2016 11:46 PM