बेळगाव : कर्नाटक-महाराष्ट सीमेवरील मराठीबहुल भाग केंद्रशासित करण्याची मागणी करण्यात येत आहे. यासंदर्भात अनेक निवेदने लोकसभेत सादर करण्यात आली आहेत; परंतु सीमाभाग केंद्रशासित करण्यासंदर्भात अद्याप सरकारकडे कोणताही प्रस्ताव विचाराधीन नसल्याची माहिती लोकसभेत देण्यात आली.
कर्नाटकात मराठी भाषिक जनतेचे वर्चस्व असलेले क्षेत्र केंद्रशासित म्हणून घोषित करण्यासंबंधी आजवर अनेकजणांनी वैयक्तिकरीत्या तसेच अनेक संघटनांनी निवेदने दिली आहेत; परंतु यासंदर्भातील प्रस्तावाचा अद्याप विचार करण्यात आला नसल्याचे लेखी परिपत्रक केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद रॉय यांनी प्रसिद्धीस दिले आहे.
सन २०११ च्या जनगणनेनुसार महाराष्ट्र-कर्नाटकच्या सीमा आणि उपजिल्ह्यांमध्ये मराठी भाषिक लोकसंख्या ५५,९८,३२५ इतकी आहे. सीमाभागातील बहुतांशी भाग हा मराठी भाषिक जनसंख्येचा असून यासंदर्भात आलेल्या मागण्यांचा आणि निवेदनाच्या प्रस्तावानुसार केंद्रशासित प्रदेश म्हणून जाहीर करण्याचा कोणताही विचार नसल्याचे रॉय यांनी लेखी कळवले आहे.