कोल्हापूर : ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे हत्या प्रकरणातील संशयित आरोपी समीर गायकवाड याच्या विरोधातील भक्कम पुराव्याचे दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले आहे. त्याची वैयक्तिक डायरी न्यायालयात सादर करण्याचा प्रश्नच येत नाही. त्यावर भाष्य करणे उचित नाही, असे स्पष्टीकरण तपासप्रमुख व राज्याचे अतिरिक्त पोलीस महासंचालक संजयकुमार यांनी शनिवारी केले. पानसरे हत्येच्या तपासासाठी शासनाने नेमलेल्या विशेष तपास यंत्रणेने (एसआयटी) समीरला १६ सप्टेंबर २०१५ला अटक केली. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी आर. डी. डांगे न्यायालयात १४ डिसेंबरला विशेष तपास यंत्रणा (एसआयटी) ने समीर विरुध्द ३९२ पानांचे दोषारोपपत्र दाखल केले. त्यामध्ये ओळखपरेड अहवाल, समीरच्या सांगलीतील घरात सापडलेले साहित्य, मोबाईल, त्याच्या मैत्रिणीचा जबाब, मोबाईल कॉल डिटेल्स, आदींसह अन्य गोपनीय पुरावे आहेत. परंतू तोपर्यंत शनिवारी (दि. २६) समीरची डायरी न्यायालयात सादर केल्याच्या बातम्या प्रसिध्द झाल्या. त्याअनुषंगाने संजयकुमार यांच्याकडे विचारणा केली असता, ‘त्यांनी त्याची डायरी ही वैयक्तिक आहे. ती न्यायालयात सादर करण्याचा प्रश्नच नाही. त्याच्या विरोधात भक्कम पुराव्यांचे दोषारोपपत्र सादर केले आहे. त्याच्या डायरीवर भाष्य करणे उचित नाही. (प्रतिनिधी)
समीरची डायरी सादर करण्याचा प्रश्नच येत नाही
By admin | Published: December 27, 2015 1:08 AM