लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर जिल्ह्यातील १५ एप्रिलपासूनच्या १६५८ कोरोना पॉझिटिव्ह रग्णांची केंद्र शासनाच्या राष्ट्रीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या पोर्टलवर नोंदच नसल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी पुणे येथील कृष्णा डायग्नोस्टिक प्रा.लि. कंपनीला गुरुवारी रात्री उशिरा कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.
कोल्हापूर जिल्ह्यात १३ प्रयोगशाळांच्या माध्यमातून गेल्या वर्षीपासून स्वॅबची तपासणी करण्यात येते. यामध्ये चार शासकीय तर सात खासगी प्रयोगशाळा आहेत. पुणे येथील कृष्णा डायग्नोस्टिक प्रा.लि. कंपनीकडून कोल्हापुरात स्वॅबचे संकलन करून ते पुणे, मुंबईतून तपासून आणण्यात येतात. गेले वर्षभर या कंपनीकडून पॉझिटिव्ह रुग्णांची माहिती नीट भरली जात होती. मात्र, या पंधरवड्यात मात्र त्यांनी १६५८ पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद राष्ट्रीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या पोर्टलवर केले नसल्याचे उघडकीस आले.
याची दखल घेत जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी गुरुवारी रात्री तातडीने या कंपनीला कारणे दाखवा नोटीस बजावली. तसेच या कंपनीकडून रुग्णांचे स्वॅब तपासणी करताना रुग्णांचा एसआरएफ आयडीदेखील तयार केला जात नाही. १५ एप्रिलपासून २६६० रुग्णांची स्वॅब तपासणी केली असता त्यातील केवळ १००२ रुग्णांचे अहवाल अपलोड केले आहेत.
उर्वरित रुग्णांचे अहवाल तातडीने न नोंदवल्यास साथ प्रतिबंधात्मक कायदा १८९७ चा भंग केल्यामुळे भारतीय दंडसंहिता अधिनियम १८६० कलम ४५ व कलम १८८ आणि नैसर्गिक आपत्ती अधिनियम २००५ मधील नियमानुसार लॅबची मान्यता रद्द करण्यात का येऊ नये याचा खुलासा मागवण्यात आला आहे.
चौकट
कमी आकडेवारीमुळे अडचणी
एखाद्या जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या किती आहे, त्यांना ऑक्सिजनची किती गरज आहे, यासह अनेक उपकरणे आणि अन्य वैद्यकीय साहित्याचा पुरवठा अवलंबून असतो. या रुग्णांची नोंदच नसल्याने त्याचा परिणाम या पुरवठ्यावर हाेऊ शकतो. त्यामुळे संतप्त झालेल्या जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने ही नोटीस काढल्याचे सांगण्यात आले.
चौकट
खासगी लॅबमधून पॉझिटिव्ह अहवालांचे प्रमाण अधिक
जिल्ह्यात १३ पैकी चार प्रयोगशाळा शासकीय आहेत. उर्वरित सात प्रयोगशाळा खासगी आहेत. या सातपैकी चार प्रयोगशाळांमधील अहवालांचा अभ्यास करता शासकीय पेक्षा खासगी प्रयोगशाळांमधील पॉझिटिव्ह अहवालांचे प्रमाण जादा असल्याचे स्पष्ट होते. शासकीय प्रयोगशाळांमधील अहवाल ९.९ ते १३.६ टक्के यादरम्यान पॉझिटिव्ह असताना खासगी प्रयोगशाळांमधील अहवाल मात्र कमीत कमी २५ टक्के ते ४१ टक्क्यांपर्यंत पॉझिटिव्ह आल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे.