कोल्हापूर : गवसे (ता. आजरा) येथील आजरा शेतकरी सहकारी साखर कारखाना भाडेतत्त्वावर देण्यासाठी जिल्हा बँकेने काढलेल्या निविदेला प्रतिसादच नाही. आज, शनिवारी निविदा दाखल करण्याचा अखेरचा दिवस असून आतापर्यंत एकही निविदा दाखल झालेली नाही.
‘आजरा’ कारखान्यांकडे जिल्हा बँकेची १०३ कोटी ७१ लाख ७८ हजार थकबाकी होती. बँकेच्या ताब्यात कारखान्याची मालमत्तेसह साखरही जप्त केली होती. साखरेची विक्री करून त्यातून ३६ कोटी ४ लाख रुपयांची वसुली बँकेने केली आहे. त्यामुळे आता कारखान्याकडे ६७ कोटी ६७ लाख रुपये कर्ज आहे. जिल्हा बँकेने यापूर्वी एक वेळा निविदा काढली होती. भाडेतत्त्वावर कारखाना चालवण्यास देण्यासाठी पुण्याच्या व्हिजन कंपनीची एकमेव निविदा आली होती. मात्र, कायद्यानुसार ती उघडता आली नाही.
बँकेने १२ मे रोजी भाडेतत्त्वावर कारखाना चालवण्यास दुसऱ्या निविदा काढली होती. गेल्या १७ दिवसांत बँकेकडे एकही निविदा आलेली नाही. आज, शनिवार निविदा दाखल करण्याचा अखेरचा दिवस असल्याने भाडेतत्त्वावर कारखाना चालवण्यास देण्याची आशा अंधुक बनली आहे.