कोल्हापूर : इंधन दरवाढीविरोधात आॅल इंडिया कॉन्फेडरेशन आॅफ गुड्स व्हेईकल ओनर्स असोसिएशनच्या (आयकग्वो) नेतृत्वाखाली देशातील ५० लाख ट्रकमालकांनी सोमवार (दि. १८) पासून बेमुदत संप पुकारला आहे. त्याचा कोल्हापूरवर थेट आणि फारसा परिणाम होणार नाही. नारळ, आयात केलेला माल येण्यावर कदाचित दोन दिवसांनंतर परिणाम होण्याची शक्यता कोल्हापुरातील व्यापारी आणि मालवाहतूकदार संघटनेच्या अध्यक्षांनी मंगळवारी व्यक्त केली.याबाबत कोल्हापूर डिस्ट्रिक्ट लॉरी आॅपरेटर्स असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष सुभाष जाधव यांनी सांगितले की, ‘आयकग्वो’ या संघटनेचा दक्षिण विभागातील कर्नाटक, तमिळनाडू, आंध्रप्रदेश, पुडुचेरी या राज्यांमध्ये प्रभाव आहे. या दक्षिण विभागामधून कोल्हापुरात रोज ६०० ट्रक मालवाहतूक करतात. मात्र, या संघटनेचे कोल्हापुरात सदस्य नाहीत; त्यामुळे या संपाचा कोल्हापूरवर थेट आणि फारसा परिणाम झालेला नाही. त्यासह होणारही नाही.
कोल्हापूर जिल्हा व्यापारी व उद्योजक महासंघाचे अध्यक्ष सदानंद कोरगांवकर म्हणाले, साउथ झोनमधून नारळ, तांदूळ आणि बंदरांद्वारे काही आयात केलेला माल येथे येतो; पण, संप पुकारलेल्या संघटनेचे सदस्य कोल्हापूरमध्ये नसल्याने त्याचा फारसा परिणाम होणार नाही.
कोल्हापुरातून मुंबईला रवाना होणाऱ्या साखरेच्या वाहतुकीवर कदाचित दोन-तीन दिवसांनी परिणाम होण्याची शक्यता आहे. या संपात महाराष्ट्रातील संघटना उतरल्यास त्याचा मोठा परिणाम होऊ शकतो.
देशात २० जुलैला ‘चक्का जाम’इंधन दरवाढ रद्द करावी, थर्ड पार्टी प्रीमियम, टोल टॅक्समधील वाढ रद्द करावी, अशा विविध मागण्यांसाठी आॅल इंडिया मोटार ट्रान्स्पोर्ट काँग्रेसतर्फे देशात दि. २० जुलैला चक्का जाम आणि बेमुदत संप केला जाणार आहे. त्यात महाराष्ट्र राज्य ट्रक, टेम्पो, टँकर बस वाहतूक महासंघ, कोल्हापूर डिस्ट्रिक्ट असोसिएशन सहभागी होणार असल्याचे जाधव यांनी सांगितले.