चंदगड : चंदगड तालुक्यात कोणत्याही अवैध धंद्याना थारा दिला जाणार नाही. तालुक्यात काही बेकायदेशीर घडत असल्यास पोलीस पाटलांनी विश्वासाने पोलिसांना त्याची माहिती द्यावी, त्यावर त्वरित कारवाई केली जाईल. कोणत्याही अवैध धंद्यांना पाठीशी घातले जाणार नाही तसेच खोटी माहिती किंवा खोट्या तक्रारी दिल्यास त्यावरही कारवाई केली जाईल, असे प्रतिपादन गडहिंग्लजचे उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे यांनी केले.
चंदगड येथे पोलीस पाटील व कोरोना योद्धयांच्या सत्कार कार्यक्रमात इंगळे बोलत होते. यावेळी बी. ए. तळेकर यांनी त्यांचे स्वागत केले.
इंगळे म्हणाले की, पोलीस पाटील हे जनता आणि पोलीस प्रशासनातील महत्वाचा दुवा असून, कायदा, सुव्यवस्था राखण्यात त्यांची मोठी मदत होते. त्यामुळे पोलीस पाटलांनीही सतर्कतेने काम करावे. त्यांनी कामात कुचराई केल्यास त्यांच्यावरही कारवाई करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.
यावेळी पोलीस उपनिरीक्षक दिलीप पवार, हवालदार रावसाहेब कसेकर, आर. पी. किल्लेदार, वैभव गवळी, सूर्यकांत सुतार, अमृत देसाई, प्रकाश पाटील, राजेंद्र पाटील, रेखा गावडे, वैष्णवी कलखांबकर, अमोल सावंत उपस्थित होते.
-----------------------
फोटो ओळी : चंदगड येथे उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे यांच्या हस्ते तुर्केवाडीच्या पोलीस पाटील माधुरी कांबळे यांना प्रशस्तीपत्र देण्यात आले.
क्रमांक : २७१२२०२०-गड-०८