कोल्हापूर - शिवराज्याभिषेक(Shivrajyabhishek) दिनाच्या निमित्त रायगडावर खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी शिवरायांच्या प्रतिमेचं पूजन केले. त्यावेळी अनेक शिवभक्त रायगडावर हजर होते. या कार्यक्रमानंतर शिवभक्तांशी संवाद साधताना छत्रपती संभाजीराजे मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मुद्द्यासंदर्भात भाष्य केले. तसेच, मराठा आरक्षणासाठी 16 जून रोजी पुन्हा आंदोलनाला सुरुवात करणार असल्याची घोषणाच त्यांनी रायगडावरुन केली होती.
छत्रपती शाहू महाराजांनी पहिल्यांदा आरक्षण दिलं. त्यांच्याच समाधी स्थळावरून १६ जूनपासून आंदोलनाला सुरूवात करणार आहोत. आधीच आणि आत्ताचं सरकार एकमेकांकडे बोट दाखवत आहे. तुम्ही आरक्षणाचा खेळ सुरू केलाय का? हा खेळ करू नका. तुम्ही माझा संयम पाहिला आहे. मी संयमी असल्याचा मला अभिमान आहे. परंतु पुढे काय होईल ते होईल मी मेलो तरी चालेल पण मराठा समाजाला न्याय दिल्याशिवाय राहणार नाही, अशा शब्दात संभाजीराजेंनी भूमिका मांडली होती. मात्र, 16 जूनचे आंदोलन हे मूक मोर्चा नसल्याचं संभाजीराजेंनी स्पष्ट केले आहे.
येत्या १६ जूनला राजर्षी छत्रपती शाहू स्मारक समाधी परिसरात मूक आंदोलन होणार असून मंत्री, खासदार व आमदारांनी मराठा आरक्षणासाठी नक्की काय करणार याची ठोस भूमिका तेथे जाहीर करावी, असे आवाहन संभाजीराजे यांनी केले. १६ जूनला दहा ते एक या वेळेत लाक्षणिक उपोषण होणार असून, आंदोलनाच्या परिसरात कोल्हापूर व राज्यातील समन्वयक, २१८५ विद्यार्थी असणार आहेत. त्यांच्यासमोर लोकप्रतिनिधींनी सन्मानपूर्वक येऊन भूमिका मांडावी, असेही त्यांनी म्हटले. सकल मराठा समाजाच्या कोल्हापुरातील समन्वयकांची शासकीय विश्रामगृह येथे बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते.
संभाजीराजेंनी आंदोलन पुढे ढकलावे
मराठा समाजाच्या आरक्षणासाठी सर्व संघटनांच्या नेत्यांनी एकत्र येण्याची गरज असून खासदार संभाजीराजे व विनायक मेटे यांनाही एकत्र आणण्याचे प्रयत्न करणार असल्याचे नमूद करत खासदार संभाजीराजेंनी कोल्हापूरमधून १६ जूनपासून पुकारलेले आंदोलनही पुढे ढकलावे, अशी त्यांना विनंती करणार असल्याचे भाजप नेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी सोमवारी (दि.७) नाशिकमध्ये पत्रकार परिषदेत सांगितले.