कोल्हापूर : कोल्हापुरातील ताराबाई पार्क येथे असलेल्या महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) विभागीय कार्यशाळा परिसरात डासांचे थैमान माजले असून, या कार्यशाळेत काम करत असलेले दहाजण डेंग्यूसदृश तापाने आजारी असून, वेगवेगळ्या खासगी रुग्णालयात ते उपचार घेत आहेत. महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाला याबाबत लेखी पत्र दिले असूनही अद्याप या परिसरात डास प्रतिबंधात्मक औषधांची व धूरफवारणी करण्यात आली नसल्याने कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी आहे.महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या ताराबाई पार्क येथील विभागीय कार्यशाळेत बसेस दुरुस्तीचे कामकाज चालते. या परिसरालगतच राज्य परिवहन कर्मचारी, अधिकारी व इतरांची निवासस्थाने आहेत. या कार्यशाळेमध्ये सुमारे २00 कर्मचारी काम करतात.सध्या सुरू असलेल्या पावसामुळे आणि गेल्या महिन्यात आलेल्या महापुरामुळे या कार्यशाळेच्या परिसरात डासांचे प्रमाण खूपच वाढलेले आहे; त्यामुळे येथे काम करणारे दहाहून अधिक कर्मचारी डेंग्यूसदृश तापाने आजारी पडले. त्यांच्यावर शहरातील विविध खासगी रुग्णालयांत उपचार सुरू आहेत; त्यामुळे येथे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्ये घबराटीचे वातावरण आहे.दरम्यान, परिवहन महामंडळाच्या विभागीय कार्यशाळेच्या यंत्र अभियंता (चालन) यांनी डास प्रतिबंधात्मक औषध व धूरफवारणी करण्याबाबत कोल्हापूर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाला आणि आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांना गेल्या आठवड्यात लेखी पत्र दिले आहे; मात्र अद्यापही या विभागाने याची दखल घेतलेली नाही; त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी आहे.