आॅनलाईन लोकमत
कोल्हापूर : ताराबाई रोडवरील सराफ पेढी फोडून चोरट्यांनी साठ तोळे सोन्याचे दागिने व रोख रक्कम चौदा लाख असा सुमारे ३५ लाख किमतीचा मुद्देमाल चोरून नेला आहे. १७ ते २० वयोगटातील दोघे तरुण चोरी करून बाहेर पडतानाचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांना मिळाले आहे. रेकॉर्डवरील गुन्हेगारांकडे चौकशी करूनही कोणतेच धागेदोरे अद्याप मिळालेले नाहीत. चोरट्यांच्या पोशाखावरून ते कॉलेज विद्यार्थी व सुशिक्षित वाटतात. नागरिकांच्या माहितीसाठी पोलिसांनी या चोरट्यांचे सीसीटीव्ही फुटेज जाहीर केले आहे. या वर्णनाचे चोरटे दिसून आल्यास पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिस निरीक्षक अनिल देशमुख यांनी केले आहे. ताराबाई रोडवर श्री साई मित्र मंडळाशेजारी सराफ कारागीर किरण हिरासो झाड (रा. पिनाक अपार्टमेंट, रंकाळा परिसर) यांची दोन मजली सराफ पेढी आहे. या ठिकाणी सोने-चांदी, अलंकार तसेच नक्षत्र डायमंडस् बनविण्याच्या आॅर्डर्स घेतात. दोघा चोरट्यांनी दि. १० मार्चच्या रात्री दुकान फोडून रोकडसह सोन्याचे दागिने लंपास केले. दुकानातील सीसीटीव्ही फुटेज पाहिले असता १७ ते २० वयोगटातील दोघे चोरटे दिसून येतात. त्यांची हालचालही संशयास्पद आहे. त्यांचा पेहराव पाहिला तर ते सुशिक्षित कॉलेज विद्यार्थी दिसतात. यावरून दुकानात कोठे काय ठेवले जाते, याची माहिती त्यांना आहे. दुकानात रोकड व दागिने असल्याची टीप त्यांना देऊन चोरी घडवून आणल्याची शंका आहे. पोलिसांनी आतापर्यंत दुकानातील कामगार, त्यांचे मित्र, काही ग्राहकांकडे कसून चौकशी केली, परंतु कोणतेच धागेदोरे हाती लागलेले नाहीत. चोरट्यांचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी जाहीर केले आहे. या वर्णनाच्या चोरट्यांना कोणी ओळखत असेल तर पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन देशमुख यांनी केले आहे. (प्रतिनिधी)