कोल्हापूर : शासनाने आठ वर्षांपूर्वी आदेश देऊनही श्री शंकराचार्य करवीरपीठाच्या हजारो एकर जमिनी लालफितीच्या कारभारात अडकल्याने पीठाकडे हस्तांतरित होऊ शकलेल्या नाहीत. शेतकऱ्यांनी या जमिनींची शासकीय नियमानुसार होणारी दान दक्षिणारूप मालकी हक्काची रक्कम पीठाकडे जमा करावी, असे आवाहन शंकराचार्यांनी पत्रकाद्वारे केले आहे.करवीरपीठाने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पीठाच्या देखभालीसाठी दान मिळालेल्या जमिनी नेत्यांनी आणि अधिकाऱ्यांनी संगनमताने स्वत:च्या व कुटुंबाच्या नावे करून घेण्याचा प्रयत्न केला आहे.
२०१० साली अधिवेशनात आमदार संजय जाधव, रवींद्र दत्ताराम वायकर, संजय पांडुरंग शिरसाट, संजय भास्कर रायमूलकर यांनी पीठाच्या जमिनी नियमबाह्य हस्तांतरित झाल्याचा तारांकित प्रश्न उपस्थित केला होता.
यावेळी तत्कालीन महसूलमंत्री नारायण राणे यांनी राधानगरी, गडहिंग्लज व करवीर तालुक्यात जमिनीचे बेकायदेशीर हस्तांतरण झाल्याची बाब चौकशीत आढळून आलेली आहे.
या जमिनीबाबत तहसीलदारांकडून चौकशी सुरू असून, तीन महिन्यांत ती पूर्ण केली जाईल, असे आश्वासन दिले होते. या घटनेला आठ वर्षे झाल्यानंतर जमिनीचे हस्तांतरण तर दूरच, पण शासकीय स्तरावर ताकतुंब्याचा प्रकार सुरू आहे.याबाबत शंकराचार्य म्हणाले, पीठाच्या हजारो एकर जमिनी आहेत. त्याची मालकी जरी पीठाची असली, तरी त्या शेतकरीच कसत आहेत. आमची फक्त एवढीच मागणी आहे की, या शेतकऱ्यानी या जमिनींची योग्य ती शासकीय नियमानुसार होणारी दान दक्षिणारूप मालकी हक्काची रक्कम पीठाकडे जमा करावी.सचिव शिवस्वरूप भेंडे म्हणाले, मठाचा वाढता व्याप पाहता, खर्चाची तोंडमिळवणी शक्य नाही. पीठाच्या जमिनी लालफितीच्या कारभारात अडकल्याने पदरमोड करून धर्मप्रसाराचे कार्य करावे लागत आहे. त्यामुळे जमिनींबाबत योग्य ती कार्यवाही करावी.