कोल्हापूर : राज्य सरकारकडे गेल्या तीन वर्षांत सांगण्यासारखी विकासकामे नाहीत. शेतकरी, दिव्यांग यांच्यासह सर्व घटक सरकारवर नाराज आहेत. भाजपचे वरिष्ठ नेते विरोधी पक्षांना कुत्रे, मांजरांसारखी उपमा देऊन सर्वसामान्यांचे लक्ष मूळ मुद्द्यांवरून विचलित करण्याचे काम करीत आहेत, अशी टीका प्रहार संघटनेचे संस्थापक व आमदार बच्चू कडू यांनी शनिवारी केली. ‘अखिल भारतीय प्रहार चित्रपट संघटने’च्या वतीने शाहू स्मारक भवन येथे आयोजित सत्कार समारंभानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.
यावेळी आमदार कडू म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दीडपट हमीभावासह सामान्य जनतेच्या बँक खात्यावर १५ लाख रुपये जमा करण्याचे आश्वासन दिल होते. सत्ता आल्यानंतर केंद्र सरकारने जाहीर केलेला हमीभाव आणि राज्य सरकारने केलेली शिफारस यांमध्ये ५० टक्क्यांचा फरक असल्याने दीडपट हमीभाव कसा देणार, असा सवालही त्यांनी केला. सरकारकडे संजय गांधी निराधार योजनेची पेन्शन देण्यास निधी नसताना १५ लाख कोठून जमा करणार, असा टोला त्यांनी सरकारला लगावला. केंद्र सरकारने अनाथ मुलांसाठी सर्वच ठिकाणी आरक्षण जाहीर केले; पण राज्य सरकारने आरक्षणाची व्याख्याच बदलून टाकली आहे. आरक्षणाची मोडतोड केल्याने अनेक अनाथ मुले आरक्षणापासून वंचित राहणार आहेत. त्यामुळे राज्य सरकारला१५ आॅगस्टपर्यंत नव्याने मसुदा तयार करून देणार आहोत.
एकलव्य व छत्रपती पुरस्कारप्राप्त दिव्यांग खेळाडूंना थेट नोकरीमध्ये सामावून घेण्याचा अध्यादेश२००३ मध्ये काढला; पण प्रशासनाने त्याची अद्यापही कार्यवाही केलेली नाही. यावरून प्रशासनावर वचक नसल्याचे सिद्ध होत आहे. याही अध्यादेशाची अंमलबजावणी करण्यास सरकारला भाग पाडू. शिवशाही बसमध्ये दिव्यांगांसाठी असणारे आरक्षण बंद केले आहे. तेही पुन्हा सुरू न केल्यास ही बस बंद पाडू, असा इशाराही त्यांनी दिला.
यावेळी अखिल भारतीय प्रहार चित्रपट संघटनेच्यावतीने दिव्यांगांना पेन्शन मिळवून दिल्याबद्दल आमदार कडू यांचा विठ्ठल पोवार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी संदीप मोहिते, दत्ताभाऊ खंडागळे, डॉ. श्रीकांत पाटील, देवदत्त माने, आदी उपस्थित होते. डॉ. श्रीकांत पाटील यांनी प्रास्ताविक केले. दगडू माने यांनी आभार मानले.प्रतीकात्मक घरकुल बांधून आंदोलनकेंद्र सरकारने अनुसूचित जाती व जमातींमधील दिव्यांगांना घरकुल देण्याचे मान्य केले आहे; पण यामध्ये खुल्या व ओबीसी घटकांचा समावेश केलेला नाही. या प्रवर्गातील दिव्यांगांना घरकुल देण्यासाठी पंतप्रधान मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावाने घरकुल बांधून प्रतीकात्मक आंदोलन करणार आहे.अखिल भारतीय प्रहार चित्रपट संघटनेच्यावतीने शाहू स्मारक भवन येथे दिव्यांगांना पेन्शन मिळवून दिल्याबद्दल आमदार बच्चू कडू यांचा विठ्ठल पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी देवदत्त माने, संदीप मोहिते, दत्ताभाऊ खंडागळे, डॉ. श्रीकांत पाटील, आदी उपस्थित होते.