भोगावती :
अत्यंत गुणवत्तापूर्वक म्हैस दुधाचा पुरवठा करणारा गोकुळ दूध संघ हा राज्यातील एकमेव असल्याने एक ब्रँड तयार झाला आहे.मात्र सध्या म्हैस दूध उत्पादनात घट होत आहे. याचा गोकुळला सामना करावा लागत आहे. दिवसाला ४ लाख लिटर म्हैस दूधविक्रीसाठी कमी पडत आहे.यासाठी उत्पादनवाढीशिवाय पर्याय नाही, असे प्रतिपादन जिल्हा दूध संघाचे अध्यक्ष विश्वासराव पाटील यांनी केले आहे.
गोकुळच्या वतीने म्हैस दूधवाढ कार्यक्रम अंतर्गत राधानगरी तालुक्यातील दूध उत्पादकांचा येथे मेळावा आयोजित केला होता. ज्येष्ठ संचालक अरुण डोंगळे म्हणाले, गोकुळ म्हैस दुधाची वाढणारी मागणी भागवण्यासाठी आम्हाला गुजरात वरून २ लाख लिटर दूध आणावे लागत आहे. ही बाब चिंताजनक आहे. कारण हा नफा आपल्या शेतकऱ्यांना मिळायला पाहिजे तो गुजरातला जातो.
संचालक प्रा. किसन चौगले म्हणाले, गोकुळ दूध संघाच्या वाटचालीत संख्यात्मक वाढ फार मोठ्या प्रमाणात झालेली आहे. सध्या गुणात्मक वाढ करण्याची फार चांगली संधी उपलब्ध झालेली आहे.याचा फायदा घेण्यासाठी म्हैस दुधाचे उत्पादन वाढविणे अतिशय गरजेचे आहे.
प्रास्ताविक संचालक अभिजित तायशेटे यांनी केले. बंडोपंत किरुळकर, पी. बी. कवडे, मेघा धनवडे यांच्या हस्ते अध्यक्ष आणि संचालक यांचा सत्कार करण्यात आला.
भोगावतीचे माजी संचालक राजाराम कवडे, प्रवीण पाटील, दत्तात्रय पाटील, बापुसो लिंगडे,तानाजी डोंगळे,डॉ. प्रकाश साळुखे यांच्यासह तालुक्यातील संस्थाचे पदाधिकारी उपस्थित होते.
फोटो ओळी
गोकुळ दुध संघाच्या वतीने राधानगरी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या साठी आयोजित मेळाव्याचे उद्घाटन करताना अध्यक्ष विश्वासराव पाटील यावेळी अरुण डोंगळे,प्रा.किसन चौगले,अभिजित तायशेटे उपसस्थित होते.