कोल्हापूर : करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिर व पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीमध्ये भ्रष्टाचार झाला आहे. याला अध्यक्ष आणि सचिव जबाबदार असून, त्यांनी केलेली बेकायदेशीर कामे उघडकीस येत आहेत. याबाबत सीबीआय चौकशी व्हावी, अशी मागणी ज्येष्ठ विचारवंत डॉ. सुभाष देसाई यांनी केली आहे. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान कमिटीकडे अंबाबाई मंदिरासह साडेतीन हजार छोटी-मोठी मंदिरे येतात. त्यावर शासकीय प्रतिनिधी म्हणून सचिवांची नेमणूक झालेली आहे. गेल्या सहा वर्षांपासून एकच व्यक्ती या पदावर आहे. निवृत्त सैनिकांवर अन्याय झाला आहे व याला सचिव आणि अध्यक्ष जबाबदार आहेत. अधिकाऱ्याने वाकी गोल (ता. राधानगरी) येथे २५ एकर जमीन घेतल्याची तसेच दोन जेसीबी आणि नागाळा पार्कमध्ये ८० लाखांच्या फ्लॅटची खरेदी केल्याची चर्चा आहे. भक्तांनी अर्पण केलेल्या अनेक उंची साड्या अनेक क्षेत्रातील संबंधितांना मुक्तपणे भेट दिल्या जात असून, खुर्चीचा आणि सरकारी पैशांचा वापर वैयक्तिक संबंध वाढविण्यावर आणि त्यातून अनेक कामे करून घेण्यावर झाला आहे.
देवीचे कोट्यवधी रुपयांचे दागिने जिल्हाधिकारी व धर्मादाय आयुक्तांची परवानगी न घेता आपल्या मित्रांना खुले करून त्यांची छायाचित्र काढू दिली. शेकडो एकर जमिनीची मोजणी करण्याचे टेंडर पाच कोटी रुपयांचे असताना मुंबईतील पार्टीला ते आठ कोटींना देण्यामध्ये कोणी पैसे खाल्ले, याची चौकशी होण्याची गरज आहे. असे अनेक प्रकारचे भ्रष्ट कारभार आता उघडकीला येत असून, पगारापेक्षा कोट्यवधी रुपयांची माया कोणी कोणी कशी निर्माण केली, त्याची चौकशी होऊन निलंबनाची कारवाई व्हावी, जिल्ह्यातील आमदार, खासदारांनी शासन दरबारी याविरोधात आवाज उठवावा, अशी अंबाबाई भक्तांची अपेक्षा व मागणी आहे, असे देसाई यांनी म्हटले आहे.
--