कोल्हापूर : गंगावेश ते शिवाजी पूल या मार्गावर पॅचवर्क नको तर तातडीने चांगल्या दर्जाचा रस्ता करा, अशी मागणी ‘आखरी रास्ता कृती समिती’च्या वतीने मंगळवारी महापौर अॅड. सूरमंजिरी लाटकर यांच्याकडे केली. यावेळी महापौर लाटकर यांनी रस्त्यासाठी शासनाकडे निधीची मागणी केली असून, निधी मिळताच चांगल्या दर्जाचा रस्ता केला जाईल. दरम्यान, तात्पुरता पर्याय म्हणून येथे पॅचवर्क करू, अशी ग्वाही दिली.कृती समितीचे किशोर घाटगे म्हणाले, शिवाजी पूल ते गंगावेश हा मार्ग शहरातील प्रमुख मार्ग आहे. या मार्गावरून अवजड वाहनांची वर्दळ असते. येथे नेहमी पुराचे पाणी येत असल्यामुळे खड्ड्यांचे साम्राज्य बनलेले आहे. सध्या रस्त्यांची अत्यंत दुरवस्था झाली आहे. धुळीमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
या रस्त्याची डागडुजी न करता तो नव्याने करावा. यावेळी नगरसेवक शेखर कुसाळे, शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, माजी नगरसेवक राजू लाटकर उपस्थित होते. तर कृती समितीचे राकेश पाटील, किशोर घाटगे, अरविंद ओतारी, डॉ. झुंझारराव पाटील, महेश कामत, सनी अतिग्रे, सुनील पाटील, मंदार जाधव, मोहसिन मणेर, सुरेश कदम, रियाज बागवान, दिग्विजय काटकर उपस्थित होते.सिमेंटचा रस्ता करणार : महापौर अॅड. सूरमंजिरी लाटकरराज्य शासनाकडे महापुरामुळे खराब झालेले रस्ते करण्यासाठी १८0 कोटींचा निधी मिळावा, असा प्रस्ताव पाठविला आहे. यामध्ये शिवाजी पूल ते गंगावेश या रस्त्याचाही समावेश आहे. निधी मिळताच येथील रस्ते करण्यात येणार आहेत. यामध्ये सतत पुराचे पाणी असणाऱ्या पंचगंगा नदी ते पंचगंगा हॉस्पिटलपर्यंतचा रस्ता सिमेंटचा होणार आहे. उर्वरित डांबरी रस्ता करण्यात येणार आहे.आता पुन्हा येणार नाही, थेट आंदोलनखराब रस्त्यामुळे परिसरातील नागरिक संतप्त झाले आहेत. रस्ता करण्यासाठी निवेदन, रास्ता रोको आंदोलन केले; मात्र काम सुरू झालेले नाही; त्यामुळे आता पुन्हा महापालिकेत रस्त्यासाठी येणार नाही, तर थेट आंदोलनच केले जाईल. महापालिकेला घेराओच घालू, असा इशारा किशोर घाटगे यांनी दिला. यानंतर प्रशासन खडबडून जागे झाले. स्थायी समिती सभापती शारंगधर देशमुख, उपमहापौर संजय मोहिते, नगरसेवक अशोक जाधव यांनी महापौरांच्या केबिनमध्ये येऊन आंदोलकांची समजूत काढली.