कोल्हापूर : विधानसभा निवडणुकीची तारीख जाहीर झाली तशी जिल्हा निवडणूक शाखेची लगबग वाढली असून, निवडणुकीचे कागदावरील नियोजन प्रत्यक्षात उतरविण्याचे प्रयत्न सुरू झाले आहे. मतदार नोंदणीचा उद्या, बुधवार शेवटचा दिवस असून, त्यानंतर अंतिम यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. दरम्यान, जिल्ह्यात विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दि. १३ सप्टेंबरपासून १५ आॅक्टोबरपर्यंत जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी कलम १४४ अनुसार प्रतिबंधात्मक आदेश लागू केला आहे. विधानसभा निवडणुकीची तारीख जाहीर झाली. आता शनिवारी (दि. २०) अधिसूचना जाहीर होणार असून, त्याच दिवसापासून उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. त्यामुळे जिल्हा निवडणूक शाखेत लगबग सुरू झाली आहे. सध्या या शाखेतर्फे प्रत्येक मतदारसंघाच्या निवडणूक अधिकाऱ्याकडे इलेक्ट्रिक व्होटिंग मशीनचे वाटप करण्याचे नियोजन करण्यात येत आहे. आवश्यक त्या कर्मचारी वर्गाच्या नियुक्तीचे काम सुरू आहे. निवडणुकीसाठी घेतलेल्या कर्मचाऱ्यांना प्रत्यक्ष प्रशिक्षण देण्याचे नियोजन केले जात आहे. कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीचे काम संपल्यानंतर पुढील आठवड्यात प्रशिक्षण आयोजित केले जाणार आहे. विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने मतदार नोंदणी करण्याची मुदत आता उद्यापर्यंत आहे. ज्यांना आपली नावे मतदार यादीत नावे समाविष्ट करायची आहेत, त्यांनी नव्याने अर्ज सादर करावेत. मतदार ओळखपत्र असले म्हणजे मतदानाचा हक्क प्राप्त झाला असे नाही; तर त्याकरिता यादीत नाव असणे आवश्यक आहे.मतदार यादीत ज्यांचे नाव नाही त्यांना नावनोंदणी करण्याची शेवटची संधी आहे. या संधीचा लाभ घेऊन नावनोंदणी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे. (प्रतिनिधी) मतदार नोंदणीचा आज शेवटचा दिवस, १५ आॅक्टोबरअखेर प्रतिबंधात्मक आदेशलाउडस्पीकरचा वापर पूर्व परवानगीशिवाय करता येणार नाही.लाउडस्पीकरचा वापर सकाळी ६ ते १० पर्यंतच करता येईल. मतदानाच्या ४८ तास अगोदर लाउडस्पीकर बंद राहतील. उमेदवारांना मतदान केंद्राबाहेर बूथ लावता येणार नाही. आचारसंहितेचे पालन करावे : जिल्हाधिकारीनिवडणूक प्रक्रिया शिस्तबद्ध, निर्भय आणि पारदर्शक पद्धतीने पार पडावी यासाठी सर्व विभागांच्या अधिकाऱ्यांनी आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी राजाराम माने यांनी केले. आदर्श आचारसंहितेच्या अंमलबजावणीबाबत सर्व विभागप्रमुखांच्या बैठकीत जिल्हाधिकारी मार्गदर्शन करीत होते. सर्व विभागप्रमुखांनी आचारसंहितेचे पालन होईल याची खबरदारी घ्यावी, असे सांगून ग्रामीण, नगरपालिका, महानगरपालिका स्तरांवरील फलकांची पूर्वपरवानगी घेणे आवश्यक आहे. परवानगी न घेतलेले फलक त्वरित काढून टाकून योग्य ती कारवाई करावी. शासकीय वास्तूंचा गैरवापर होणार नाही, याची काळजी घ्यावी. निवडणूक प्रक्रियेसाठी सर्व विभागांनी वाहने व कर्मचारी उपलब्ध करून द्यावेत, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या.
निवडणूक विभागाची लगबग वाढली
By admin | Published: September 16, 2014 11:03 PM