कोपार्डे : कोल्हापूर-गगनबावडा मार्गावर बालिंगा (ता. करवीर) येथे असलेल्या ब्रिटिशकालीन पुलाला समांतर नवीन पूल उभारण्यात येणार आहे. कोल्हापूर ते कळे पर्यंतच्या मार्गाचे दुपदरीकरण होणार असून, यात बालिंगा येथे समांतर पुलाचा समावेश आहे. यासाठी १६८ कोटी रुपयांचा निधीही मंजूर झाला आहे.
कोल्हापूर - गगनबावडा - तळरे या दरम्यान सातत्याने वाढणारी वाहतूक व गोवा - मुंबई महामार्गाला जोडणारा रस्ता म्हणून या मार्गाला महत्त्व निर्माण झाले होते. या मार्गावर वाहतुकीचा ताण वाढल्याने याचे रुंदीकरण करण्याची मागणी होती.
कोल्हापुर - गगनबावडा - तळेरे या राज्य मार्गाला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा मिळाल्याने या मार्गाचे रुंदीकरण व मजबुतीकरण करण्यासाठी १६८ कोटींचा निधी मंजूर झाला आहे. यात पहिल्या टप्प्यात कोल्हापूर - कळे दरम्यानचा १६.४४ कि.मी. रस्ता दुपदरी होणार आहे. यात १४ मीटरने रस्त्याचे काँक्रिटीकरण होणार आहे. रस्त्याची रुंदी १४ मीटर राहणार आहे. या रुंदीकरण रस्त्यासाठी यापूर्वीच भूसंपादन झाले असले तरी ज्या-ज्या ठिकाणी आवश्यक असेल त्या-त्या ठिकाणी तातडीने तडजोड करून भूसंपादन करण्यात येणार आहे.
कोल्हापूर - गगनबावडा दरम्यान बालिंगा येथे १३५ वर्षांपूर्वीचा ब्रिटिशकालीन रिव्हज पूल आहे. या पुलाला नवीन समांतर पूल करण्यात येणार आहे. यासाठी भूसंपादनही करण्यात येणार आहे. यामुळे या पुलावरील वाहतुकीचा ताण कमी होणार आहे. हा पूल आजही स्ट्रक्चरल ऑडिटमध्ये व्यवस्थित असल्याने त्याच्या मजबुतीवर शिक्कामोर्तब झाले आहे.
चौकट : पहिल्या टप्प्यात कोल्हापूर - कळे दरम्यानच्या रस्त्याला प्राधान्य देण्यात आले आहे. पाणी निर्गतीसाठी मोरी वजा लहान पूल बांधण्यात येणार आहेत. वाहतुकीला अडथळा येऊ नये यासाठी रस्त्यावरील गावांच्या ठिकाणी जंक्शन अशी सुविधा करण्यात येणार आहे. यामुळे वाहतुकीतील अडथळा दूर करून वाहनांना सुरक्षित व विना-अडथळा प्रवासासाठी सुविधा करून देण्यात येणार आहे. या मार्गावरून मोठ्या प्रमाणात कोकणात प्रवासी व मालवाहतूक होते. दररोज किमान नऊ ते दहा हजार छोट्या-मोठ्या वाहनांची या मार्गावरून ये-जा होत असते.
चौकट : पावसाळा संपल्यानंतर रस्त्याच्या कामाला सुरुवात होणार आहे. यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून निविदा काढण्यात येणार आहेत. २०२३ पर्यंत हे काम पूर्ण करावयाचे आहे. २०३३ पर्यंत या रस्त्याच्या डागडुजीची जबाबदारी संबंधित ठेकेदारावर राहणार आहे.
कोट : कोल्हापूर-गगनबावडा-तळेरे दरम्यानच्या रस्त्यापैकी कोल्हापूर-कळे दरम्यानचा रस्ता काँक्रिटीकरण होणार आहे. बालिंगा पुलाला समांतर नवीन पूल उभारला जाणार आहे. यासाठी केवळ भूसंपादन करावे लागणार आहे. बाकी रस्त्यासाठी यापूर्वीच भूसंपादन झाले आहे. अतिक्रमण झाले असेल तर ते काढून १४ मीटरने रस्ता रुंदीकरण होणार आहे.
सचिन सांगावकर, कार्यकारी अभियंता सा. बां. वि.
फोटो
: १७ बालिंगा पूल
कोल्हापूर-गगनबावडा मार्गावर बालिंगा येथे असलेला याच ब्रिटिशकालीन पुलाला नवीन समांतर पूल होणार आहे.