पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील उचगाव, गोकुळ शिरगाव एमआयडीसी-कणेरीवाडी फाटा, लक्ष्मीटेक-कागल पंचतारांकित औद्योगिक वसाहत फाटा या ठिकाणच्या महामार्गावरील तांत्रिक बाबी लक्षात घेऊन जागर फौंडेशनने पाठविलेल्या निवेदनाची दखल महामार्ग प्रशासनाने घेतली. पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील वाहतुकीची कोंडी फोडण्यासाठी नवीन उड्डाणपूल व मोठ्या ब्रिजसाठी प्रस्तावित कागल-सातारा सहापदरीकरण योजनेत समाविष्ट करण्यात आल्याची माहिती जागर फौंडेशनचे अध्यक्ष बी. जी. मांगले यांना भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण प्रकल्प संचालक व्ही. डी. पंदरकर यांनी पाठविलेल्या पत्रात दिली आहे. लक्ष्मी टेक-कागल पंचतारांकित औद्योगिक वसाहत येथे ९५ मीटर लांबीचा (२५× ४५ ×२५) फ्लायओव्हर प्रस्तावित सहापदरीकरण योजनेत समाविष्ट करण्यात आला आहे. उचगाव ब्रिजसाठी २० मीटर लांबीचा व ५.५ रुंदीचा भुयारी मार्ग बनविण्यात येणार आहे. गोकुळ शिरगाव -कणेरीवाडी एमआयडीसी फाट्यावरील वाहतूक कोंडीचा विचार करून या ठिकाणी २×१५.१० चा उड्डाणपूल प्रस्तावित योजनेत समाविष्ट केला आहे. या कामासाठी जागर फौंडेशनचे बी. जी. मांगले, भीमराव गोंधळी, जिल्हा अध्यक्ष भारत प्रभात पार्टी, सनी गोंधळी, प्रल्हाद गोंधळी, संदीप गोंधळी यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता.
राष्ट्रीय महामार्गावर उड्डाणपूल, ब्रिज होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2021 4:22 AM