कोल्हापूर : महापालिकेत सत्ताधाऱ्यांकडून पुन्हा पदाची खांडोळी करण्यात आली आहे. महापौरपद महिन्यासाठी यापूर्वी दिल्याचे उदाहरण असताना आता परिवहन समिती सभापतिपदाचीही याप्रमाणे वाटणी केली आहे. शिवसेनेच्या प्रतिज्ञा महेश उत्तुरे यांच्याकडून गुरुवारी परिवहन समिती सभापतिपदाचा राजीनामा घेण्यात आला आहे. महिन्यासाठी हे पद चंद्रकांत सूर्यवंशी यांना मिळण्याची शक्यता आहे.महापालिकेमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेची सत्ता आहे. या महाविकास आघाडीचे पद वाटपाचे सूत्र ठरले आहे. स्थायी समिती सभापतिपदाच्या निवडीत मदतीसाठी परिवहन समिती सभापतिपद शिवसेनेला दिले आहे. महापालिकेच्या सभागृहाची मुदत महिन्याने संपणार असतानाच शिवसेनेकडून हे पद काढून घेऊन राष्ट्रवादीच्या सदस्याला देण्यात येत आहे. ह्यपरिवहनह्णच्या गुरुवारी झालेल्या बेठकीत नेत्यांच्या आदेशानुसार प्रतिज्ञा उत्तुरे यांनी परिवहन समिती सभापतिपदाचा राजीनामा दिला.
यावेळी त्या म्हणाल्या, मिळालेल्या कमी कालावधीमध्ये परिवहन समितीसाठी नवीन सभागृह बांधणे, सीएनजी इंधनावर बस चालविण्यासाठी बसचे इंजिन रूपांतरीत करणे, बसमध्ये एलईडी स्क्रीन बसवून परिवहन उपक्रमासंबंधीची माहिती प्रसिादित करणे, यंत्रशाळा व मुख्य कार्यालयामध्ये मेडाच्या माध्यमातून ऊर्जा संवर्धन प्रकल्प राबविण्यासाठी प्रयत्न केले. यावेळी ज्येष्ठ परिवहन समिती सदस्य अशोक जाधव, शेखर कुसाळे, यशवंत शिंदे, आशिष ढवळे, सतीश लोळगे, महेश वासुदेव, चंद्रकांत सूर्यवंशी उपस्थित होते.