कोल्हापूर : शहरातील प्रमुख रस्त्यांच्या पॅचवर्कच्या कामास बुधवारपासून (दि. ६ जानेवारी) सुरुवात होणार आहे. यामध्ये ३४ रस्त्यांचा समावेश असून पॅचवर्क पेव्हर पध्दतीने केले जाणार आहे. सुमारे दोन कोटींच्या कामास महापालिका प्रशासनाची नुकतीच मान्यता मिळाली आहे.
महानगरपालिकेमार्फत शहरात अनेक भागात रस्त्यांची कामे सुरू आहेत. काही प्रमुख रस्त्यांवर पडलेले लहान-मोठे खड्डे बुजविण्यासाठी दोन कोटींचा निधी राखीव ठेवण्यात आला होता. त्यातून प्रमुख ४० रस्त्यांवरील खड्डे पेव्हर पध्दतीने बुजविले जाणार आहेत. महापालिका प्रशासनाने यासंदर्भात ठेकेदारांकडून निविदा मागविल्या होत्या. त्यापैकी ३४ रस्त्यांच्या कामास ठेकेदारांकडून प्रतिसाद मिळाला आहे. त्याच्या निविदा नुकत्याच उघडल्या आहेत. तांत्रिक बाजू तपासून झाल्यानंतर म्हणजे येत्या बुधवारपासून प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल, असे सांगण्यात आले.