गणेश शिंदे ।कोल्हापूर : गरिबांना नि:शुल्क गुणात्मक वैद्यकीय सेवा मिळावी, या उद्देशाने केंद्र सरकारने सुरू केलेल्या ‘आयुष्यमान’ प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेत (पीएमजेएवाय) कोल्हापूर जिल्ह्यातील कुटुंबप्रमुखांना सोमवार (दि. १७)पासून कार्ड वाटप केले जाणार आहे.
जिल्ह्यातील दोन लाख ४ हजार ३४५ कुटुंबांना ही कार्डे मिळणार आहेत. ग्रामीण भागात जिल्हा आरोग्याधिकारी यांच्याकडून तालुका आरोग्य अधिकारी यांच्याकडे, तर शहर पातळीवर नगरपालिका, नगरपंचायत किंवा नगरपरिषद भागात मुख्याधिकारी यांच्याकडून वॉर्ड आॅफिसर सर्व ‘आशा’ कर्मचाऱ्यांना ही कार्डे देणार आहेत. त्याचबरोबर महापालिका क्षेत्रात आरोग्याधिकाºयांच्याकडून सर्व शहरी ‘आशा’ कर्मचारी कार्ड वाटप करणार आहेत.सामाजिक, आर्थिक व जातनिहाय जनगणनेतील (२०११ नुसार) देशातील दहा कोटी गरीब कुटुंबे या योजनेचे लाभार्थी असून त्यांपैकी ८३.७२ लाख कुटुंबे महाराष्ट्रातील लाभार्थी आहेत. त्यापैकी ग्रामीण भागात ५८.९१ लाख कुटुंबे, तर शहरी भागात २४.८१ लाख कुटुंबे आहेत.
या कुटुंबांना प्रतिवर्ष पाच लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार शासकीय व खासगी रुग्णालयांत मिळणार आहेत. देशात आजपर्यंत १२ हजार कार्डे वाटप करण्यात आली. उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय व प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावरील एका कर्मचाºयास ही जबाबदारी देण्यात येणार आहे. आयुष्यमान भारत योजनेत जिल्ह्यातील ग्रामीण भागामधील एक लाख ३९ हजार ११९, तर शहरी भागात ६५ हजार २२६ कुटुंबांची नोंद आहे. जवळपास सर्वच आजारांचा या योजनेत समावेश आहे.
ज्यांच्याकडे या कार्डवाटपाची जबाबदारी देण्यात आली आहे, त्या कर्मचाºयांचे प्रशिक्षण महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेचे जिल्हा समन्वयक देणार आहेत. ‘आयुष्यमान’चे काम सध्या महात्मा फुले योजनेचे जिल्हा समन्वयक यांच्याकडे आहे.
दरम्यान, महाराष्ट्रातील ८९ शासकीय रुग्णालयांत २५ सप्टेंबर २०१८ ला पहिल्या टप्प्यात या योजनेला सुरुवात झाली. पहिल्या तीन महिन्यांसाठी म्हणजे ३१ डिसेंबर २०१८ पर्यंत ही योजना शासकीय रुग्णालयांत सुरू राहणार आहे.खासगी रुग्णालयांबाबत सकारात्मकदोन दिवसांपूर्वी ‘आयुष्यमान भारत’ योजनेबाबत बैठक झाली. या बैठकीत खासगी रुग्णालयांना समाविष्ट करण्याबाबत चर्चा झाली. यामध्ये या रुग्णालयांना समाविष्ट करण्याबाबत केंद्र सरकार सकारात्मक असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.
असे असेल कार्डकार्डच्या डाव्या बाजूला कुटुंबप्रमुखाचे नाव, त्यावर त्याचा संपूर्ण पत्ता व बारकोड असणार आहे. उजव्या बाजूला कुटुंबातील अन्य जणांची नावे (उदा. पती, मुलगा, मुलगी, बहीण, भाऊ, आदी) असणार आहेत. या वैद्यकीय सेवेचा लाभ मिळण्यासाठी हे कार्ड ‘आरोग्यमित्र’ यांना द्यावे लागणार आहे.आयुष्यमान कार्डमुळे लाभार्थ्यांना जलदगतीने वैद्यकीय सेवेचा लाभ मिळणार आहे.- डॉ. सुभाष नांगरे, जिल्हा समन्वयक, ‘आयुष्यमान’ प्रधानमंत्री जनआरोग्य योजना, कोल्हापूर.