पेठवडगाव : जीवन जगण्यासाठी गरजा फार कमी लागतात; पण सद्य:स्थितीत माणसाने त्या वाढवून ठेवल्या आहेत. आशाआकांक्षा मर्यादित ठेवल्या तर जीवन अगदी सहजपणे जगता येते. दुसºया व्यक्तीला तोशीस होणार नाही. त्यांच्या डोळ्यांत अश्रू येणार नाहीत, अशी जीवनात वाटचाल ठेवा, असे आवाहन सिनेअभिनेता नाना पाटेकर यांनी केले.
येथील शाहू शिक्षण संस्थेच्या सुवर्णमहोत्सवी वर्षातील विजयवंत महोत्सवाच्या समारोप कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. सुहास वारके होते. यावेळी माजी पोलीस आयुक्त गुलाबराव पोळ, विजयादेवी यादव, विद्या पोळ, आर. डी. पाटील, सुनील हुक्केरी, राजन शेटे, आनंदराव म्हेत्रस, जवाहर सलगर, संगीता मिरजकर, अनिता चव्हाण, आदी प्रमुख उपस्थित होते. यावेळी संस्थेच्यावतीने विजयादेवी यादव मानपत्र देण्यात आले.
नाना पाटेकर पुढे म्हणाले, नुसत्या शिक्षणावर आयुष्य संपत नाही. त्याला संस्काराची जोड लागते. समाजात आजूबाजूला होणारी घुसमट समजली पाहिजे. ती घुसमट मांडून त्यावर उपाय शोधता आला पाहिजे. बाहेरच्या जगात फिरताना घाबरता कामा नये. समोर अघटित काही घडत असेल तर धावून जाऊन प्रतिकार करण्याची हिंमत बाळगली पाहिजे.
डॉ. सुहास वारके म्हणाले, समाजाचे रक्षण करता करता वर्दीला रंग प्राप्त झाला याचा सार्थ अभिमान वाटतो. छत्रपती शिवाजी महाराज व राजर्षी शाहू महाराज यांच्या विचारांचा वारसा जिल्ह्यातील जनतेला आहे. त्यामुळे आजच्या संगणक युगातील या जिल्ह्याची नवी ओळख आंतरराष्ट्रीय पातळीवर करणारी युवा पिढी या संस्थेत घडली आहे.
विद्या पोळ म्हणाल्या, तत्कालीन काळात प्रस्थापित शाळेने नाकारलेल्या बहुजन समाजातील मुलांना शिक्षण देण्यासाठी स्व. विजयसिंह यादव यांनी या संस्थेची स्थापना केली होती. मूल्य आधारित संस्कारक्षम शिक्षण देणे हा संस्थेचा हेतू आहे. स्वत:चा स्वार्थ साधण्यासाठी स्व. यादव यांनी कधीही सौदेबाजी केली नाही. आर्थिक पुरवठा करणाºया शिक्षण संस्था उभा न करता माणूस घडविणारी ही संस्था निर्माण केल्याचे समाधान मिळतआहे.
राजन अतिग्रे, वर्षा सहदेव यांनी सूत्रसंचालन केले. प्राचार्या विजया चव्हाण यांनी आभार मानले.