कोल्हापूर : शहरात चोरट्यांनी धुमाकूळ घातला. संंभाजीनगरातील गजानन महाराज नगर परिसरासह रुईकर कॉलनी, नागाळा पार्क येथे एकूण सहा ठिकाणी घरफोड्या करून पोलिसांसमोर आव्हान निर्माण केले. चोरट्यांनी बंद बंगले, दुकाने यांना लक्ष्य केले. चोरट्यांनी रात्रीच्या वेळी कुलूप तोडून, कडी-कोयंडे उचकटून लाखो रुपयांचा ऐवज चोरून नेला. या घरफोड्या सत्रामुळे नागरिकांत घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.
नागाळा पार्कमध्ये चंदवाणी सिरॅमिक्समध्ये सात लाखांची चोरी
नागाळा पार्क, शाहू ब्लड बँकेसमोरील चंदवाणी सिरॅमिक्स या दुकानाच्या गोदामाचे कुलूप व शटर अज्ञात चोरट्याने उचकटून आतील विविध कंपन्यांचे क्वॉक, स्टॉप क्वाॅक, शाॅवर, बेंडपाइप, मिक्सर शॉवर, मिक्सर क्वॉक आदी ७ लाख १३ हजार २७२ रुपयांचा माल चोरून नेला. ही चोरी मंगळवारी ( दि. १७) पहाटे झाली. व्यवस्थापक दिलीप गोविंदराम चंदवाणी (रा. व्यंकटेश्वरा अपार्टमेंट, ताराबाई पार्क) यांनी मंगळवारी रात्री उशिरा शाहूपुरी पोलीस ठाण्यात चोरीची तक्रार दिली.
रुईकर कॉलनीत २५ हजारांची घरफोडी
रुईकर कॉलनीतील युनिक पार्क परिसरात कविता विशाल चौगुले (वय ३५, रा. नागदेववाडी, ता. करवीर) यांचे बंद घर अज्ञात चोरट्याने फोडून आतील एलईडी टीव्ही, सिडी प्लेअर, टेबल फॅन, सांसारिक साहित्य आदी सुमारे २५ हजार ६४० रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. ही घटना सोमवारी पहाटे घडली. याची जुना राजवाडा पोलिसांत नोंद झाली आहे.