कोल्हापूर : देवदर्शनासाठी निघालेल्या महिलेच्या गळ्यातील सोन्याची चेन हिसकावून चोरट्यांनी धूम ठोकली. ही घटना बुधवारी (दि. १२) सकाळी पावणेसातच्या सुमारास साने गुरुजी गृहनिर्माण सोसायटीमध्ये घडली. चेन पळवणारे दोन चोरटे कर्नाटक पासिंगच्या दुचाकीवरून आल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहे.साने गुरुजी वसाहत परिसरातील साने गुरुजी गृहनिर्माण सोसायटीमधील महिला जवळच असलेल्या गणपती मंदिरात दर्शनासाठी निघाली होती. यावेळी एक तरुण रस्त्यात उभा होता, तर दुसरा तरुण दुचाकीवर थांबला होता. बाजूने चालत आलेल्या तरुणाने महिलेच्या गळ्यातील सोन्याची चेन हिसकावली. त्यानंतर दोघे दुचाकीवरून निघून गेले. महिलेने आरडाओरडा केला. मात्र, परिसरातील लोक घराबाहेर येण्यापूर्वीच चोरटे पसार झाले. नागरिकांनी याची माहिती जुना राजवाडा पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. कर्नाटक पासिंगच्या दुचाकीवरून चोरटे आल्याचे फुटेजवरून स्पष्ट झाले.दरम्यान, साने गुरुजी गृहनिर्माण सोसायटीने स्वखर्चातून परिसरात १७ कॅमेरे लावले असून, चोरी, चेन स्नॅचिंगच्या घटनांमधील आरोपींचा शोध घेण्यासाठी त्याची पोलिसांना मदत होत आहे. गेल्या चार वर्षात १३ घटनांमध्ये संशयितांचा शोध घेण्यास सीसीटीव्ही कॅमे-यांची मदत झाल्याची माहिती सोसायटीतील जितेंद्र मोरे यांनी दिली.
Kolhapur: भरदिवसा चोरट्यांनी महिलेच्या गळ्यातील चेन हिसकावली, घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद
By उद्धव गोडसे | Published: April 12, 2023 2:13 PM