कुरुंदवाड : सोने, चांदी, पैशाची सर्रासपणे चोरी होते. मात्र, हेरवाड (ता. शिरोळ) येथे शेतातील चांगला भाव आलेल्या टोमॅटोचीच चोरी झाली आहे. बुधवारी रात्री अज्ञात चोरट्यांनी सुमारे ६० ते ७० हजार रुपये किमतीचे टोमॅटो चोरून नेली आहे. शेतावर सीसीटीव्ही कॅमेऱ्याची नजर असतानाही चोरट्यांनी अंधार व पावसाचा फायदा घेऊन सीसीटीव्हीलाही चकवा दिला आहे. अशोक मस्के यांच्या शेतात ही चोरी झाली असून या चोरीमुळे मोठा धक्का बसला आहे.सध्या टोमॅटोला चांगला भाव आला आहे. १५० ते १६० रुपये किलो भाव झाल्याने टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. हेरवाड येथील अशोक मस्के या शेतकऱ्याने २० गुंठे टोमॅटोची शेती केली आहे. उन्हाळ्यात पाण्याची टंचाई निर्माण झाली असतानाही अत्यंत कष्टाने टोमॅटो पीक जगविले. एक आठवड्यापूर्वी पीक काढणीला सुरू झाले आहे. टोमॅटोच्या दराने दीडशे पार केल्याने कष्टाचे चीज झाले होते; परंतु बुधवारी रात्री पाऊस आणि अंधाराचा फायदा घेत अज्ञात चोरांनी शेतातील सुमारे २० ते २५ कॅरेट टोमॅटो तोडून नेले आहेत. गुरुवारी सकाळी मस्के शेतात गेल्यानंतर चोरीचा प्रकार उघडकीस आला. चोरीच्या या घटनेमुळे शेतकऱ्यांतून संताप व्यक्त होत आहे.
Kolhapur News: शेतात ‘सीसीटीव्ही’ कॅमेरे लावले, तरी चोरट्यांनी ५० हजारांचे टोमॅटो चोरले
By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2023 1:02 PM