भोगावती : भोगावती शिक्षण प्रसारक मंडळ हडप करू पाहणाऱ्या लुटारूंना आम्ही येथून हद्दपार केले आहे. म्हणून या शिक्षण संकुलात विद्या नांदू लागली आहे, असे प्रतिपादन जिल्हा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष, माजी आमदार पी. एन. पाटील यांनी केले आहे.कुरुकली (ता. करवीर) येथील भोगावती कॉलेज येथे एक कोटी २२ लाख खर्च करून नव्याने बांधण्यात आलेल्या राजर्षी शाहू जलतरण तलावाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी प्राचार्य संघटनेचे जिल्हाध्यक्ष सी. आर. गोडसे हे होते. पाटील म्हणाले, भोगावती शिक्षण संस्था आमच्या ताब्यात आल्यापासून पाच कोटी ५० लाखांपर्यंतची विविध प्रकारची कामे यु.जी.सी.कडून मंजूर करून आणली आहेत. या कॉलेजच्या प्रगतीसाठी राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरांवर चर्चा करून प्रस्ताव दाखल करून आम्ही प्रयत्न करीत आहोत. येथे शिकणाऱ्या विद्यार्थ्यांला उच्च दर्जाचे शिक्षण मिळावे, ही एकच गोष्ट आम्ही ठरविली आहे. यापूर्वी येथे काम करणाऱ्या मंडळींनी संस्था स्वत:च्या नावावर करण्याचा प्रयत्न चालविला होता.संस्थाध्यक्ष प्रा. ए. डी. चौगले प्रास्ताविक करताना म्हणाले, अतिशय कमी खर्चात म्हणजे एक कोटी २२ लाखांत आम्ही हा जलतरण तलाव उभा केला आहे. प्राचार्य डॉ. दिनकर पाटील यांनी स्वागत केले. अध्यक्ष सी. आर. गोडसे यांचेही भाषण झाले. ‘गोकुळ’ दूध संघाचे संचालक पी. डी. धुंदरे, बाळासाहेब खाडे, उदय पाटील, हिंदुराव चौगले, शिवाजीराव तळेकर, दत्तात्रय मुळीक, एम. आर. पाटील, बी. ए. पाटील, शिवाजी कारंडे, विश्वनाथ पाटील, वसंतराव पाटील उपस्थित होते. प्रा. सुनील खराडे यांनी आभार मानले. (वार्ताहर)
लुटारूंना हद्दपार केले
By admin | Published: April 22, 2016 1:52 AM