कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठातील शिवपुतळा परिसरामधील बगीचा सुशोभीकरणातील रेलिंगचा (संरक्षक कठडा) दगड आणि आकार बदलण्यात यावा. रेलिंगसाठी कोल्हापूर परिसरातील काळा दगड वापरावा. हा बदल मान्य झाल्यानंतरच सुशोभीकरणाचे काम सुरू करावे, अशी मागणी समस्त कोल्हापूरवासीय शिवभक्त नागरी कृती समितीने सोमवारी शिवाजी विद्यापीठाकडे केली. या सुशोभीकरणाबाबत जनभावनेचा विचार केला जाईल, अशी ग्वाही कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी समितीला दिली.या रेलिंगसाठी सध्या वापरलेला दगड आणि त्याच्या आकाराला कृती समितीने विरोध दर्शविला होता. समितीच्या सूचना जाणून घेण्यासाठी विद्यापीठ प्रशासनाने सोमवारी बैठक घेतली. त्यासाठी कुलगुरू डॉ. शिंदे, ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार, विद्यापीठ सेवक संघाचे अध्यक्ष बाबा सावंत, बांधकाम व्यावसायिक व्ही. बी. पाटील, प्र-कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के, आदी प्रमुख उपस्थित होते.
बैठकीच्या प्रारंभी उपकुलसचिव डॉ. गिरीश कुलकर्णी यांनी सुशोभीकरणाचा आराखडा, त्यासाठीचा निधी, आदींबाबतची माहिती दिली. कृती समितीचे अशोक पोवार म्हणाले, सध्याचा रेलिंगचा दगड, आकार चुकीचा असून तो बदलावा. जोतिबा डोंगर परिसरातील काळा दगड वापरावा.
संभाजीराव जगदाळे म्हणाले, शिवपुतळा आणि परिसराला वेगळा इतिहास असून, तो पुसून सुशोभीकरण करू नये. लालासो गायकवाड, सतीशचंद्र कांबळे यांनी या बैठकीला हेरिटेज समिती सदस्य, आर्किटेक्ट अनुपस्थित असल्याचा निषेध केला. सुशोभीकरणासाठी आर्किटेक्ट असोसिएशनचे मार्गदर्शन घ्यावे. हे काम गांभीर्याने करावे, असे सुचविले.
चंद्रकांत यादव म्हणाले, लोकभावना विचारात घेऊन काम व्हावे. सुभाष देसाई म्हणाले, या कामासाठी निधी कमी पडत असल्यास लोकवर्गणीतून निधी जमवावा. फिरोजखान उस्ताद आणि गिरीश फोंडे यांनी या कामात शिवकालीन स्थापत्यशास्त्राचा विचार करण्याची सूचना केली. बाबा सावंत यांनी या परिसराशी विद्यापीठातील विविध घटकांचे भावनिक बंध आहेत. सुशोभीकरणात मूळ ढाचा बदलणार नसल्याचे सांगितले.
डॉ. जयसिंगराव पवार यांनी सुशोभीकरणाच्या कामासाठी निधी उपलब्धतेचा प्रश्न नाही. कृती समितीने केलेल्या सूचनेनुसार दगड आणि रेलिंगचा आकार बदलण्याबाबत विद्यापीठ प्रशासनाने सकारात्मक कार्यवाही करावी, असे सांगितले. त्यावर कुलगुरू डॉ. शिंदे म्हणाले, शिवपुतळ्याच्या चबुतऱ्याला कोणताही धक्का लागणार नाही. केवळ बगीच्याचे सुशोभीकरण केले जाणार आहे. रेलिंगसाठी विद्यापीठाने महाराणी ताराराणी चौकातील पुतळ्याप्रमाणे दगड वापरण्याची सूचना केली होती. हेरिटेज समितीच्या सूचनेनुसार विद्यापीठाने कार्यवाही केली आहे.
समितीने दगड, आकार बदलण्याबाबतची केलेली सूचना मान्य आहे. ही सूचना हेरिटेज समिती, विविध अधिकार मंडळांसमोर ठेवून त्यांच्या मान्यतेनंतर पुढील कार्यवाही केली जाईल. या बैठकीस अॅड. पंडितराव सडोलीकर, अजित सासने, महादेव पाटील, बाबा जामदार, मदन चोडणकर, रामभाऊ कोळेकर, आदी उपस्थित होते. कुलसचिव डॉ. व्ही. डी. नांदवडेकर यांनी आभार मानले.