कोल्हापूर : करवीर निवासिनी श्री अंबाबाईच्या किरणोत्सवात मंगळवारी सुर्यकिरणे देवीच्या मूर्तीच्या खांद्यापर्यंत आली. सायंकाळी ५ वाजून ४५ मिनिटांनी चरणस्पर्श केलेली किरणे ५ वाजून ४८ मिनिटांपर्यंत खांद्यावर येवून डावीकडे लुप्त झाली. मंगळवारप्रमाणेच किरणांची तीव्रता चांगली राहिली तर बुधवारी किरणे चेहऱ्यावर येण्याची शक्यता आहे.अंबाबाईचा किरणोत्सव रविवारपासून सुरु झाला असून मंगळवारी किरणांची तीव्रता चांगली होती. थंडीचे दिवस असल्याने महाद्वारात अतीतीव्र असलेली किरणे गाभाऱ्यापर्यंत येईपर्यंत मात्र कमी होत जातात. मंगळवारी सायंकाळी ५ वाजून २ मिनिटांनी मावळतीची सुर्यकिरणे महाद्वार कमानीत आली.
येथून पुढे गरुड मंडप, चौथरा, कासव चौक, पितळी उंबरा, चांदीचा उंबरा, पहिली पायरी असा प्रवास करत किरणांनी ५ वाजून ४५ मिनिटांनी मूर्तीचा चरणस्पर्श केला. त्यानंतर ५ वाजून ४६, ४७, ४८ व्या मिनिटाला कमरेच्यावरपर्यंत आली. हा सोहळा १२ तारखेपर्यंत होवू शकतो अशी माहिती प्रा. मिलिंद कारंजकर यांनी दिली. यावेळी देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव, सदस्य शिवाजीराव जाधव, राजू जाधव, सचिव विजय पोवार उपस्थित होते.